सातारा : महिला शेतकरी गटांची ‘इर्जिक शेती’

सातारा : महिला शेतकरी गटांची ‘इर्जिक शेती’
Published on
Updated on

खटाव :  पूर्वी शेतीच्या मशागतीपासून पेरणी, खुरपणी, काढणी, मळणी अशी कामे इर्जिकच्या माध्यमातून केली जायची. शेतीकामाला मजूर मिळत नसल्याने एकत्रित कामे करण्यासाठी साग्रसंगीत इर्जिकचा शेतकर्‍यांना मोठा आधार मिळायचा. पै पाहुणे, शेजारीपाजारी एकत्र येवून भलरीच्या तालावर शेतीची कामे मार्गी लावायचे. खटाव तालुक्यातील भोसरे गावात महिला शेतकरी गट एकत्र येवून इर्जिकच्या माध्यमातून शेतीची कामे चुटकीसरशी करत आहेत.

'गडणी ग, सजणी ग' हे गीत गुणगुणत अगदी आनंदाने आणि एकमेकांना मदत करत भोसरेतील शेतकरी गटांनी मिळून 24 एकर क्षेत्रातील सोयाबीनची काढणी करुन लाखो रुपयांची बचत केली आहे. भोसरे गावच्या सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गटातील शेतकरी गेल्या आठ दिवसांपासून दररोज तीन ते चार तास एकमेकांच्या शेतात इर्जिक करून फक्त काढणीसाठीची तब्बल एक लाख तीस हजार रुपयांची बचत केली आहे. येथील इर्जिकच्या अनोख्या सोहळ्याची सांगता करण्यासाठी शेवटच्या दिवशी गटातील गुजर आज्जींचे 6 एकरमधील सोयाबीन काढणीसाठी खटाव, माण आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकरी गटांना इर्जिकचे आमंत्रण दिले होते. साग्रसंगीत आणि दिमाखदार पद्धतीने या वर्षीच्या इर्जिक सोहळ्याची सांगता करण्यात आली.

या सोहळ्यासाठी आठ शेतकरी गटांतील एकत्रित मिळून 124 शेतकरी सहभागी झाले होते. सकाळी आठ वाजल्यापासून सोयाबीनच्या काढणीला सुरुवात करण्यात आली. केवळ अडीच-तीन तासात सहा एकरमधील सोयाबीन काढणी हसत खेळत पूर्ण झाली. शेतीकामासाठी मजूर मिळत नसताना भोसरेकरांनी पारंपरिक इर्जिकच्या
माध्यमातून शेतीची कामे लिलया पार पाडून इतरांसाठी आदर्श घालून दिला आहे.

सावड, इर्जिकची सांगड…

पूर्वीपासून शेतीच्या कामात एकमेकांना मदत करण्याचा रिवाज आहे. दोन शेतकरी कुटुंबे एकमेकांच्या शेतात कामे करायची त्याला सावड म्हटले जायचे. मोठ्या प्रमाणावर शेती असेल आणि मजूर मिळत नसतील तर इर्जिक केले जायचे. समुहाने एकत्र येवून शेतीची कामे करण्याला इर्जिक म्हणतात. ते साग्रसंगीत असते. झुणका भाकरीच्या न्याहरीपासून रात्री मटण किंवा गोडधोडाचा बेत केला जातो. शेती कामे करताना 'अगं मैना तुझी हौस पुरवीन' या गाण्यासह उत्साह वाढवण्यासाठी भलरी आणि लोकगीते गायली जातात.

भलरी गीताच्या तालावर शेतातील कामे…

शेतातील कामे करताना भलरी गीत गायले जाते. शेती कामे उत्साहात करण्यासाठी हलगी आणि इतर वाद्ये वाजवली जातात. भलरी दादा भलरी , भलरी म्हणू का भलरी, व्हय रं गड्या भलरी दादा भलरी तट जंगलात, मैना दिलीया कोकणात, तीला मुराळी रगुनाथ, घोडं बांधलया अंगणात, त्याला जेवाया दुध भात भलरी दादा भलरी, अशी जोशपूर्ण वातावरण निर्मिती करणारी लोकगीते इर्जिकच्या वेळी गायली जातात.

इर्जिकमध्ये सहभागी झालेले महिला शेतकरी गट

खटाव तालुक्यातील जिजाऊ महिला शेतकरी गट, सावित्री महिला शेतकरी गट, जयराम महिला शेतकरी गट (जायगाव), सुयोग पाणी फाउंडेशन महिला शेतकरी गट (पांगरखेल), प्रगती महिला शेतकरी गट (विसापूर), छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट (भोसरे), कोरेगाव तालुक्यातील कृषिलक्ष्मी महिला शेतकरी गट (आसनगाव) तसेच माण तालुक्यातील यशवंत शेतकरी गट (पिंपरी)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news