बाल आरोग्य अभियान चिमुरड्यांसाठी लाईफलाईन | पुढारी

बाल आरोग्य अभियान चिमुरड्यांसाठी लाईफलाईन

विशाल गुजर

सातारा : कोणाला बोनमॅरो, कोणाला हृदयविकार, तर कोणाला यकृताचा त्रास असणार्‍या चिमुरड्यांची संख्या मोठी आहे. या प्रत्येकाला लाखो रुपयांचा खर्च करणे म्हणजे कुटुंबावर कोसळलेले आर्थिक संकटच असते. या कुटुंबांना आता  राष्ट्रीय बालआरोग्य अभियानामुळे (आरबीएसके) दिलासा मिळाला आहे. या अभियानातून जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील वर्षभरात 40 हृदयाच्या तर 1 हजार 9 विविध शस्त्रक्रिया झाल्या आहेत. हजारो चिमुरड्यांना याचा लाभ झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा ठरत असून आरबीएसके अभियान मुलांसाठी एक प्रकारे लाईफलाईनच ठरत आहे.

मुंबईतही होणार उपचार

पुण्यासह नाशिक, वर्धा आणि मुंबईतही यासाठी हॉस्पिटल देण्यात आले आहेत. तेथेही उपचार होतील. नाशिक येथे सुयोग हॉस्पिटल व चोपडा मेडिकेअर अँड रिसर्च सेंटर, मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल आणि वर्धा येथे आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्पिटल यांचा समावेश आहे. लहान मुलांचे बरेचसे हृदयविकार आता शस्त्रक्रियेद्वारे योग्य उपचाराने चांगले होतात. याबद्दलची सखोल माहिती डॉक्टर आपल्याला देऊ शकतात. शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च (जास्त प्रमाणात असल्यास) अनेक एनजीओ किवा सेवाभावी संस्था शिवाय सरकारी योजनांमधून मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे पालकांनी काळजी करू नये.

कोठे कराल संपर्क?

यासाठी तुमच्या येथील आरबीएसके डॉक्टर किंवा जिल्हा रुग्णालयात चौकशी करावी.
कोण आहे पात्र?
या उपचारांसाठी शून्य ते 18 वयोगटातील
सर्व बालके पात्र आहेत. त्यासाठी त्या
बालकाचा शाळा शिकत असलेला
अंगणवाडी किंवा शाळेचा दाखला,
डॉक्टरांचे शस्त्रक्रियेचे अंदाजपत्रक आणि जिल्हा शल्यचिकित्सकांची मंजुरी ही
कागदपत्रे आवश्यक आहेत.
काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर लहान बाळांना खूप दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागते आणि घरी गेल्यानंतर वरचेवर तपासणी, काही छोट्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. यासंबंधीसुद्धा सर्व माहिती डॉक्टरांकडून मिळते. त्यामुळे लहान मुलांच्या हृदयविकारासंदर्भात बाळाला आजाराचे निदान झाल्यास त्याबाबत पालकांनी योग्य वेळी उपचार करावे.
– डॉ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक
1. जन्मजातच दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या मुलांचे आरोग्य जोपासण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालआरोग्य अभियानातून (आरबीएसके) प्रयत्न केले जातात. दरवर्षी शासकीय शाळांमध्ये 0 ते 18 वयोगटातील मुलांची तपासणी केली जाते. त्यामुळे मुलांना कोणते आजार आहेत का, हे तपासून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठीही प्रयत्न केले जातात. अनेकदा काही गैरसमजुतीतून काही पालक शस्त्रक्रिया करण्यास तयार होत नाहीत. अशा वेळी अभियानातील डॉक्टर, कर्मचारी समुपदेशन करतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यात शस्त्रक्रिया होण्याचे प्रमाण जास्त आहे.
2. शून्य ते 18 वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या ‘आरबीएसके’अंतर्गत पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे बालकांच्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. याबाबतचा करार राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने नुकताच हॉस्पिटलसोबत केला आहे. यामुळे बालकांसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करण्याची गरज पालकांना नाही.
3.पुण्यातील नर्‍हे येथील काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयरोग (कंजेनायटल हर्ट डिसिज), अस्थिरोग शस्त्रक्रिया (ऑर्थोपेडिक सर्जरी), प्लास्टिक सर्जरी, मेंदूची शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जरी), दातांची शल्यचिकित्सा (डेंटल सर्जरी), कानाचे उपचार (ईएनटी) आणि डोळ्यांचे उपचार (आप्योल्मालॉजी) मोफत होणार आहेत. आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी (फाटलेली दुभंगलेली टाळू). हृदयशल्यचिकित्सा, अस्थिरोग शस्त्रक्रिया (ऑर्थोपेडिक सर्जरी), मेंदूची शस्त्रक्रिया (न्यूरो सर्जरी), दातांची शल्यचिकित्सा (डेंटल सर्जरी), ऐकू येण्यासाठी क्वाक्लिअर नवले इंप्लांट आणि डोळ्यांचे उपचार (आप्याल्मालॉजी) हे उपचार होणार आहेत. हे उपचार झाल्यावर त्याचे पैसे आरबीएसकेने ठरवलेल्या दरांनुसार देण्यात येणार आहेत.

Back to top button