सातारा : जुळ्या मुलींना जन्म देऊन मातेचा मृत्यू

सातारा : जुळ्या मुलींना जन्म देऊन मातेचा मृत्यू
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने मातेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सातार्‍यात जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. जुळ्या मुलींचा जन्म झाल्यानंतर कुटुंबीय आनंदात असतानाच अवघ्या काही तासांत मातेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही बाळं सुखरूप असली, तरी मातेला मात्र जीव गमवावा लागला. त्यामुळे जन्मताच बाळांचे मायेचे छत्र हरपले. भागाबाई पांडुरंग कोकरे (वय 40, रा. वेळेढेण, ता. जावली) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी मातेचे नाव आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी, भागाबाई कोकरे यांना त्यांच्या पतीने दि. 10 रोजी पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले होते. भागाबाई कोकरे यांच्यावर उपचार सुरु झाले. साडेसहा वाजता त्यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. दोन्हीही बाळांची प्रकृती चांगली आहे. प्रसुतीनंतर भागाबाई कोकरे यांनी नाष्टाही केला. दुपारपर्यंत कोकरे कुटुंबिय आनंदात होते. मात्र, प्राथमिक माहितीनुसार सायंकाळी भागाबाई यांना अचानक थंडी वाजून आली. काही वेळानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. वैद्यकीय अधिकार्‍यांना याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ उपचाराला सुरुवात करुन त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र रात्री सव्वादहा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोकरे कुटुंबियांना याची माहिती मिळाल्यानंतर ते हादरुन गेले. रुग्णालयात त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. जुळ्या मुली आईपासून पोरक्या झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news