आरक्षणावरून वंचित जातींमध्येच संघर्ष नको : डॉ. भारत पाटणकर | पुढारी

आरक्षणावरून वंचित जातींमध्येच संघर्ष नको : डॉ. भारत पाटणकर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : आरक्षण हा गरीब-श्रीमंतीचा मुद्दा नाही, तर तो जातीय शोषणाचा प्रश्न आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर वंचित जातींमध्ये संघर्ष होणे चुकीचे आहे. आता 1881 पासून कुणबी नोंद असणार्‍यांनाच प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा स्पष्ट झाल्याने बाहेरील कोणीही ओबीसीत घुसडण्याचा प्रश्नच येणार नाही, अशी भूमिका श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सातार्‍यात मांडली.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते. महात्मा फुले यांनी तीन प्रकारांत कुणबी विभागले जातात, असे म्हटले आहे. कोरडवाहू शेती करणारे कुणबी, बागायती शेती करणारे ते माळी कुणबी आणि शेती तसेच मेंढपाळी करणारे धनगर कुणबी होय. 1881 च्या जनगणनेचा उल्लेख करत डॉ. पाटणकर म्हणाले, 1884 च्या मुंबई प्रेसिडेन्सीच्या गॅझेटस्मध्ये प्रत्येक जिल्ह्याची जातवार विभागणी दिली असून, त्यात काही ठिकाणी मराठा आणि कुणबी यांची वेगळी लोकसंख्या दिली आहे. तर, सातारा जिल्ह्यात कुणबी जातीची संख्या दिली आहे. पण, मराठा घटकांची संख्या वेगळी दिलेलीच नाही. सर्वच गॅझेटसमध्ये (हैद्राबाद धरून) इतर सर्व जातींची संख्या नोंदवलेली आहे.

आज उच्चजातीय 96 कुळी मराठा जातीचे म्हणवणार्‍यांनी कुणबी नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी कुणबी आरक्षणाला नकार दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील उच्च जातीय 96 कुळी मराठा व्यक्तींनी एकत्र येऊन तसा ठरावच केला आहे. सातारा जिल्ह्यातील उच्चजातीय 96 कुळी मराठ्यांनीही मुख्यमंत्र्यांसमोर हेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे जे पूर्वीपासून (1881 ) कुणबी आहेत, त्यांचेच रेकॉर्ड शोधून तेवढ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा स्पष्ट झाला आहे. त्यामुळे मराठा म्हणवणार्‍यांना ओबीसींमधून आरक्षण नकोच आहे. मराठा म्हणवणार्‍यांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातूनच ठरणार आहे, असे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

ज्यांची कुणबी जात म्हणून नोंद पूर्वीपासूनच्या दप्तरात नाही त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे बाहेरचे कोणी ओबीसींमध्ये घुसडण्याचा प्रश्न येणारच नाही. सर्व जिल्ह्यातील कुणबी शोध पडताळणी संपली की हा प्रश्न संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आंदोलन फक्त उच्च जातीय 96 कुळी मराठा समाज यांच्यापुरते आणि न्यायालयात लढण्याचेच शिल्लक राहू शकते. यामुळे ओबीसी जातींनी आज तरी संघर्ष करण्याचा मुद्दा उरलेला नाही, असे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

मराठा उच्चजातीयांनी आता ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी न करता 50 टक्क्याच्याबाहेर मराठा विशेष आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांना आता संघर्ष करण्याचे कारण उरलेले नाही. कुणबी नसलेली एकही व्यक्ती आता आरक्षणात घुसण्याचा प्रश्नच निकालात निघालेला आहे, असे डॉ. भारत पाटणकर यांनी स्पष्ट केले.

अशी आहे जातनिहाय लोकसंख्या

1881 च्या जनगणनेनुसार जातनिहाय लोकसंख्येची माहिती
सातारा जिल्हा – कुणबी 5,83,569, माळी 24,539, धनगर 41,547
सोलापूर जिल्हा – कुणबी 1,80,000, माळी 2,400 धनगर 57,704
कोल्हापूर जिल्हा – कुणबी 2,99,871, माळी 1,407, मराठा 62,287, धनगर 38,326.

Back to top button