Maharashtra Kesari : दोन महाराष्ट्र केसरीमुळे पैलवान संभ्रमात; कुस्ती शौकीनही गोंधळात | पुढारी

Maharashtra Kesari : दोन महाराष्ट्र केसरीमुळे पैलवान संभ्रमात; कुस्ती शौकीनही गोंधळात

सातारा : विशाल गुजर : रांगड्या मातीतली प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे पाहिले जाते. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी दोन संघटनांनी शड्डू ठोकला आहे. आपलीच स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. मात्र, कोणती स्पर्धा अधिकृत आणि कोणती अनधिकृत याबाबत मल्ल आणि कुस्ती शौकीन यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. पैलवान कोणती स्पर्धा खेळायची याबाबत बुचकळ्यात पडले आहेत. दरम्यान, फुलगाव (पुणे) येथे आज दि. 7 ते 10 नोव्हेंबर तर धाराशिव येथे दि. 16 ते 20 नोव्हेंबर अखेर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे.

स आपआपली प्रतिष्ठा जपण्यासाठी यंदा चक्क एकाच वर्षात दोन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा घाट दोन्ही गटांनी घातला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने देखील फुलगाव (पुणे) येथे आज दि. 7 ते 10 नोव्हेंबर अखेर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनासाठी शड्डू ठोकला आहे. यासाठी जिल्हानिहाय निवड चाचणीही सुरू आहे. तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने दि. 16 ते 20 नोव्हेंबर अखेर धाराशिव येथे 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन्ही गटांनी आपलीच स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा केला आहे. एखादा कुस्तीगीर एका स्पर्धेत सहभागी झाल्यास त्याला दुसर्‍या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. तसेच पंच देखील अनधिकृत स्पर्धेत सहभागी झाले तर पंचांच्या अधिकृत पॅनेलवरून काढून टाकण्यात येईल, असा दबाव दोन्ही गटाकडून टाकला जात आहे. त्यामुळे स्पर्धा कोणती अधिकृत व कोणती अनधिकृत याचे कोडे पडले आहे.

37 व्या गोवा नॅशनल गेम स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांनी वेगवेगळ्या ठिकाणी निवड चाचणी एकाच दिवशी घेऊन संघ पाठवले होते.

मात्र, स्पर्धेत एक संघ खेळवल्यास दुसर्‍या संघातील खेळाडूंचे नुकसान होईल याकरीता भारतीय ऑलिम्पिक संघटनेने महाराष्ट्रात पुन्हा निवड चाचणी घेऊन संघ निवडीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दोन्ही गटांनी सहमतीने एकच निवड चाचणी घेऊन राष्ट्रीय स्पर्धेला संघ पाठवला. दोन्ही गटांनी तुटेल एवढे न ताणता समन्वय साधून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेऊन महाराष्ट्राची आब राखावी अशी चर्चा कुस्ती क्षेत्रात सुरू आहे.

संघटनांमध्येच डाव-प्रतिडाव

महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुस्ती क्षेत्रात राज्यातील सर्वोच्च किताबाची स्पर्धा मानली जाते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने याचे आयोजन केले जाते. मात्र, अलीकडे या संघटनेत फूट पडून दोन गट निर्माण झाले आहेत. कुस्तीगीर परिषदेवर दावा सांगण्यासाठी डाव-प्रतिडाव सुरू आहेत.

मोहोळ कुटुंबाची गदा धाराशिवला

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खुल्या गटातील विजेत्या मल्लाला कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ कुटुंबीयांच्या वतीने मानाची गदा देण्यात येते. यंदा ही गदा धाराशिव येथे होणार्‍या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लाला देण्यात येणार असल्याचे माजी खासदार अशोक मोहोळ यांनी जाहीर केले आहे.
दुसरा गट कोणते नाव वापरणार?

यापूर्वी देखील महाराष्ट्रात कुस्तीगीर संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद असे दोन गट होते. 2002 साली कुस्तीगीर संघाने परिषदेला समांतर अधिवेशन (स्पर्धा) घेऊन विजेत्या मल्लांना महान महाराष्ट्र केसरी किताब दिला होता. सध्या देखील दोन स्पर्धा झाल्या तर कुस्तीगीर परिषद विजेत्यांना महाराष्ट्र केसरी किताब देणार आहे. दुसरा गट कोणते नाव वापरतो, हे समजेल.

Back to top button