सातारा : ग्रा.पं. चा आज गुलाल; चुरशीने 77 टक्के मतदान | पुढारी

सातारा : ग्रा.पं. चा आज गुलाल; चुरशीने 77 टक्के मतदान

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींसाठी रविवारी किरकोळ अपवाद वगळता चुरशीने; पण शांततेत 77.28 टक्के मतदान झाले. कराड, पाटण, वाई, खटाव, माण या तालुक्यांमध्ये निवडणूक असलेल्या अधिक़ ग्रामपंचायती असल्याने तेथे चुरस दिसून आली. संवेदनशील ग्रामपंचायतींसाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सोमवारी प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असून, निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. बिनविरोध ग्रामपंचायती वगळून 64 ग्रामपंचायतींसाठी रविवारी 216 केंद्रावर मतदान झाले. यामध्ये सातारा तालुक्यातील 3, कराड 12, पाटण 17, कोरेगाव 5, वाई 11, जावली 6, फलटण 4, माण 3 आणि खटाव तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. रविवारी सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ झाला. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान सुरूच होते. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी गावकारभार्‍यांनी प्रयत्न केले.
यामध्ये माण तालुक्यात 89 टक्के, कोरेगावमध्ये 85.50 टक्के, खटावमध्ये 81 टक्के, सातारा 75.40 टक्के, फलटणमध्ये 83 टक्के, कराड 75, पाटण 77 आणि जावली तालुक्यात 75 टक्के, वाईमध्ये 77 टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणकीसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदानावेळी काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांमधील कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी 21 मतदान केंद्रावर 77.94 टक्के मतदान झाले. दरम्यान, सोमवार दि. 6 रोजी ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार असून या मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button