पळशी/पिंपोडे बुद्रक, पुढारी वृत्तसेवा : आ. महेश शिंदे शासकीय अधिकार्यांशी उर्मटपणे वागत आहेत. उर्मट वागणे ही सातारा जिल्ह्याची संस्कृती नाही. आ. महेश शिंदे शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोट्या पोलिस केसेस दाखल करत आहेत. अजून दहा महिने आहेत. असे प्रकार पुढील काळात खपवून घेतले जाणार नाहीत; अन्यथा गाठ माझ्याशी आहे याचे भान आ. महेश शिंदे यांनी ठेवावे, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला. दरम्यान, आ. शशिकांत शिंदे हेच कोरेगावचे पुढचे आमदार असून त्यांचा साठावा वाढदिवस याच ठिकाणी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाईल, असेही खा. सुळे यांनी स्पष्ट केले.
कोरेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीचा स्वाभिमान मेळावा अंबवडे चौकात झाला. यावेळी त्या बोलत होत्या. मेळाव्यात आ. शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, वैशाली शिंदे, प्रभाकर देशमुख, सत्यजितसिंह पाटणकर, दिपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रदीप विधाते, युवक अध्यक्ष नितीन लवंगारे, पांडुरंग भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दिल्लीतील अदृश्य शक्तींनी फोडली. महाराष्ट्रातील कर्तबगार नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अधिकार कमी करून मराठी नेत्याचे खच्चीकरण केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे 105 आमदार निवडून आणले, तरीही त्यांना उपमुख्यमंत्री करून त्यांचे पंख छाटले. दिल्लीतील अदृश्य शक्तींनी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि महाराष्ट्राचे पर्यायाने मराठी माणसाचे कंबरडे मोडण्याचे काम दिल्लीतील अदृश्य शक्तीने केले, अशी टीका देखील त्यांनी केली. आ. महेश शिंदे यांच्याबद्दल बर्याच तक्रारी आहेत अधिकार्यांबद्दल ते चुकीचे बोलतात. शासकीय अधिकार्यांशी तुम्ही कसे उर्मटपणे आणि चुकीचे वागत आहात, हे आम्हाला समजले आहे. ही महाराष्ट्राचीच नव्हे तर सातारा जिल्ह्याचीही संस्कृती नव्हे, असा टोलाही त्यांनी लगावला.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, गेल्या 20 ते 25 वर्षांच्या काळात मी माणसं कमावली. सातारा जिल्ह्यात पावसातील सभेने इतिहास घडवला आहे. शत्रू पक्षात सर्वात जास्त भिती ही, शरद पवार नावाची आहे. त्यामुळे 'जंग अभी शुरू हुई है, शरद पवार अभी बाकी है' असे म्हणत आ. शशिकांत शिंदे यांनी विरोधकांवर शरसंधान साधले.
आ. शिंदे पुढे म्हणाले, केंद्रात मोदींची हुकुमशाही पाहिली तीच कोरेगाव मतदार संघात पाहतोय. आमची लढाई पदाची नाही, हुकुमशाहीच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. उध्दव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून सगळीकडे सांगत सुटले, मी सरकार पाडले. आताचं बजेट हे गुवाहाटीला गेलेला एखादा फुटू नये म्हणून आहे. मी मागील निवडणुकीत बर्याच जणांना अंगावर घेतल्याने, मला मागच्यावेळी फटका बसला. शशिकांत शिंदे कुठुन लढणार याबाबत अनेकजण विचारतात, परंतु या हुकुमशहाला मीच पाडणार. ज्या दिवशी डोक्याच्या वरती जाईल त्या दिवशी शशिकांत शिंदे रस्त्यावर उतरेल. त्यावेळी महागात पडेल, असा थेट इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांना दिला. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले.