जरांगे-पाटलांची तोफ आज धडाडणार; फलटण, दहिवडीतील सभांची जय्यत तयारी | पुढारी

जरांगे-पाटलांची तोफ आज धडाडणार; फलटण, दहिवडीतील सभांची जय्यत तयारी

फलटण/दहिवडी; पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांची तोफ ऐतिहासिक फलटणनगरी व दहिवडीमध्ये आज, शुक्रवारी धडाडणार आहे. सायंकाळी 5 वाजता फलटणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर रात्री 8 वाजता दहिवडीतील इंगळे मैदानावर होणार्‍या जाहीर सभांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दोन्ही सभांना मराठा समाज लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिली.

जरांगे-पाटलांच्या फलटण व दहिवडीतील सभेकडे लक्ष लागून राहिले आहे. जरांगे-पाटील यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये सकाळी 9 वाजता मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाईक रॅलीचे आयोजन केले असून, शहरात मराठा समाजात जनजागृती करण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता बारामती मार्गावरून मनोज जरांगे-पाटील हे येणार असून, त्यांचे स्वागत जेसीबीतून पुष्पवृष्टी करून होणार आहे. हलगी व तुतारीच्या निनादात भव्य स्वागत झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विराट सभा होणार आहे. या सभेला कोल्हापूरचे मराठा मार्गदर्शक अ‍ॅड. बाबा इंदूलकर हेही मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटण समन्वयकांनी दिली आहे. ‘न भूतो न भविष्यती’ अशी ही सभा होणार असल्याचे सांगण्यात आले.

सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी फलटण शहरात भेट देऊन सभास्थानाची पाहणी केली. तसेच सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेतला. सभा शांततेत पार पाडण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक घेऊन आवश्यक सूचनाही दिल्या.

Back to top button