

महाबळेश्वर, पुढारी वृत्तसेवा : येथील केट्स पॉईंट जवळील निडल होल पॉईंटवर धबधब्याचे फोटो व व्हिडीओ तसेच सेल्फी काढताना पुणे येथील नवविवाहिता सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळून ठार झाली. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले. अंकिता सुनील शिरस्कर (गुरव) (वय 23, सध्या रा.धनकवडी, पुणे) असे या नवविवाहितेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, अंकिता व रेल्वेमध्ये लोको पायलट (चालक) असलेले सुनील ज्ञानदेव शिरस्कर (वय 30, रा. उंबरेगव्हाण, ता. जि. धाराशिव सध्या रा. धनकवडी पुणे) हे दाम्पत्य सोमवार दि. 9 रोजी दोन दिवसांसाठी दुचाकीवरून महाबळेश्वर पर्यटनास आले होते. मंगळवारी दुपारी जेवण करून ते पुणे येथे जाण्यास निघाले. महाबळेश्वरपासून सहा कि.मी अंतरावर आले असता पतीकडे पत्नीने पुन्हा केट्स पॅाईंट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पतीने मात्र लांबचा प्रवास दुचाकीवरुन करायचा आहे, खूप वेळ जाईल, परत जाऊ, असे अंकितास सांगितले. परंतु, अंकिताने हट्ट धरल्याने हे दाम्पत्य दुपारी साडेचार वाजता पुन्हा केट्स पाँईट येथे पोहोचले. केट्स पॅाईंट पाहून ते निडल होल परिसरातील धबधबा पाहण्यास गेले. तेथे सुरक्षा कठड्यावर बसून त्यांनी फोटो काढले. धबधब्याचा फोटो व व्हिडीओ घेताना अंकिता कठड्यावरुन थेट तिनशे फूट खोल दरीत कोसळली. यात ती जागीच ठार झाली.
या प्रकाराने पतीने आरडाओरडा सुरु केला. हा गोंधळ ऐकून स्थानिकांनी अपघात स्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती स्थानिकांनी महाबळेश्वर व पाचगणी पोलीस ठाण्यासह वनविभाग, महाबळेश्वर ट्रेकर्स व सह्याद्री ट्रेकर्स यांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वनविभागाचे अधिकारी व जवानांनी अपघात स्थळी धाव घेतली.
पाचगणीचे सपोनि राजेश माने, महाबळेश्वर पो. उपनिरीक्षक रौफ ईनामदार, स्नेहल सोमदे, महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनिल भाटिया व सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पार्टे व टिमने 5.30 वा. मदतकार्यास सुरुवात केली. दोन अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह दरीतून वर काढण्यात यश आले.
अंकिताला नियतीने बोलावून घेतले?
सुखी संसाराचे अंकिताचे स्वप्न अधुरेच राहिले. तिच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे. अंकिता पतीसह दोन दिवस महाबळेश्वरमध्ये होती. मंगळवारी ते दोघे माघारीही निघाले होते. महाबळेश्वरपासून 6 कि.मी. अंतर ते पुढेही गेले होते. असे असताना अंकिताने पुन्हा केटस् पॉईंटला जाण्याचा हट्ट धरल्याचे पतीने म्हटले आहे. अंकिताला नियतीने बोलावून तर घेतले नाही ना? अशीच चर्चा महाबळेश्वरमध्ये सुरू होती.