सातारा : 47 लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक | पुढारी

सातारा : 47 लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

सातारा, पुढारी वृत्तसेवा : राज्यात बंदी असलेला गुटखा सातारा पोलिसांनी शेेंद्रे (ता. सातारा) गावच्या हद्दीत पकडला. कंटेनरमध्ये सापडलेल्या गुटख्याची किंमत सुमारे 47 लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. हा कंटेनर पुण्याकडे निघाला होता. दरम्यान, गुटखा व कंटेनर जप्त करण्यात आला आहे.

गुफारान शमीम खान (वय 36, रा. भोलेनाथ नगर, मुंब्रा, ठाणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरासह जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर गुटख्याची तस्करी वाढत असल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला (एलसीबी) सातार्‍यातून कंटेनरमधून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. दि.1 ऑक्टोबर रोजी एक ट्रक कंटेनर
संशयास्पदरीत्या शेंद्रे येथे थांबल्याची माहिती मिळाली.

पथकाने कंटेनर चालकाला थांबवून चौकशी केली असता त्याने कंटेनरमध्ये गुटखा असल्याची माहिती दिली. पोलिसांनी कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये विक्रीस बंदी असणारा पान मसाला, फ्लेवर्ड पानमसाला, गुटखा असा मुद्देमाल होता. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर हा माल 47 लाख 1 हजार 120 रुपये किमतीचा असल्याचा समोर आले. तसेच 20 लाख रुपये किमतीचा ट्रक कंटेनर असा एकूण 67 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. दरम्यान, हा गुटखा नेमका कोणाचा? यामध्ये नेमका किती जणांचा सहभाग आहे? गुटखा कुठून आणला होता व तो नेमका कुठे घेऊन जात होता? याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी याबाबतची माहिती अन्न औषध विभागाला दिली. त्यानुसार अन्न सुरक्षा विभागाने गुटखा ताब्यात घेऊन तो जप्त केला. यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण देवकर, सपोनि सुधीर पाटील, रविंद्र भोरे, फौजदार पंतग पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, पोलीस विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, विशाल पवार, सचिन ससाणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button