वराडे लोकवस्तीत फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद | पुढारी

वराडे लोकवस्तीत फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद

कराड, पुढारी वृत्तसेवा : वराडे (ता. कराड) येथे रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात तीन बिबटे फिरत असून हे बिबटे सीसीटीव्हीत अनेकदा कैद झाले आहेत. वराडेच्या पश्चिम बाजूला सीसीटीव्ही कॅमेर्‍यात मंगळवारी पहाटे पुन्हा बिबट्या कैद झाला. या प्रकाराने वराडे ग्रामस्थांची पाचावर धारण बसली असून घरातून बाहेर पडायचे कसे, या चिंचेत ग्रामस्थ आहेत. ग्रामस्थांनी बिबटे पकडण्यासाठी गावात सापळा लावण्याची मागणी केली आहे; मात्र वन विभागाने अद्याप याची दखल घेतलेली नाही.

बिबट्यांनी माजी सरपंच आनंदराव जाधव यांच्या पाळीव कुत्र्यासह गावातील अनेक पाळीव कुत्री फस्त केली आहेत. अनेक महिन्यांपासून येथील डोंगर परिसरात बिबट्यांचा वावर आहे. आता बिबटे लोक वस्तीत वावरू लागल्याने भीतीचे वातावरण आहे. तीन बिबटे एकत्रितपणे गावात फिरत असल्याचे अनेकदा सीसीटीव्हीत दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी या बिबट्यांनी एका युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या युवकाने आरडाओरड केल्याने बिबटे पळून गेले होते.

बिबट्यापासून लहान मुले व जनावरे सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान गावकर्‍यांसमोर आहे. वन विभागाचे स्वतंत्र कार्यालय वराडेत आहे. मात्र त्यांच्याकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. दरम्यान वराडे ग्रामपंचायतीनेही या संदर्भात वनविभागाकडे पत्रव्यवहार करुन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Back to top button