महाबळेश्वर हाऊसफुल्ल; वर्षा पर्यटन बहरले | पुढारी

महाबळेश्वर हाऊसफुल्ल; वर्षा पर्यटन बहरले

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य दिन व सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच रेलचेल अनुभवायास मिळत आहे. पावसाची रिमझिम बरसात, कडाक्याची थंडी, हिरवागार निसर्ग अन् धुक्यात लपटलेले वातावरण, याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. रिसॉर्टस्, लॉजिंगचे दर वाढले असून अनेकांनी आधीच रूम आरक्षित केलेल्या आहेत.

महाबळेश्वर व पाचगणीत वर्षा पर्यटनाचा माहोल असून महाबळेश्वरचा प्रसिद्ध लिंगमळा धबधबा दाट धुक्यात ओसंडून वाहत आहे. या धबधब्याचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेले वेण्णालेक दाट धुक्यात हरवले आहे. वेण्णालेकसह क्षेत्र महाबळेश्वर मंदिर तसेच विविध पॉईंटवर पर्यटकांची रेलचेल आहे महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटकांचे माहेरघर असलेल्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी स्वातंत्र्य दिन व सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची रेलचेल आहे. हिरव्यागार वनश्रीने महाबळेश्वरचे रूप पूर्णपणे पालटले असून डोंगर कपारीतून उंचावरून वाहणारे धबधबे, दाट धुक्याची चादर पसरली आहे. या सुखद व रम्य वातावरणाची मजा लुटण्यासोबतच पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत.

पाऊस व दाट धुक्यात पर्यटक वेण्णालेक येथे नौकाविहार करत असून अनेक हौशी पर्यटक घोडसवारी करताना दिसत आहेत. धुंद वातावरणात खवय्ये पर्यटक गरमागरम मका पकोडा, कांदा भजी, मका कणीस, आलेदार चहासह गरमागरम मॅगीचा आस्वाद घेताना पहावयास मिळत आहेत. मुख्य बाजारपेठेत गरमागरम चणे, चिक्की फजसोबतच उबदार ब्लँकेट, कानटोपी, मफलर, येथील प्रसिद्ध चप्पल्स खरेदीसाठी पर्यटकांची पावले बाजारपेठेकडे वळत आहेत.

Back to top button