सातारा : शेतकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांना बीआरएसची भुरळ | पुढारी

सातारा : शेतकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांना बीआरएसची भुरळ

अशोक मोहने

कराड :  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पश्चिम महाराष्ट्रात भारत राष्ट्र विकास आघाडी (बीआरएस) मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बैठका, मेळाव्यांच्या माध्यमातून पक्ष गाव पातळीवर सक्रिय झाला आहे. याचा परिणाम म्हणून विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी बीआरएसमध्ये प्रवेश करू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात विविध शेतकरी संघटनांमध्ये बीआरएस प्रवेशाचे लोण पसरले आहे.
कोल्हापूर, सांगली नंतर सातारा जिल्ह्यात भारत राष्ट्र समितीने आपला विस्तार वाढविण्यास सुरुवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून विविध शेतकरी संघटनांचे काही पदाधिकारी बीआरएसमध्ये प्रवेश करू लागले आहेत. बळीराजा शेतकरी संघटनेमध्ये फूट पडली असून संघटनेचे प्रदेश अध्यक्ष बी. जी. पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, कराड तालुका अध्यक्ष उत्तमराव खबाले यांच्यासह काही पदाधिकारी बीआरएसमध्ये सक्रिय झाले आहेत.
रयत शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी बीआरएसच्या वाटेवर असल्याचे समजते. स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनाही बीआरएसने ऑफर दिली आहे. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गोडसे यांनी बीआरएसमध्ये काम सुरू केले आहे. संघटना बांधनीची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्या संघटनेचे अनेक पदाधिकारी बीआरएसमध्ये प्रवेश करून गावोगावी बीआरएसची ध्येय धोरणे पोहोचवू लागले आहेत.
दोन दिवसापूर्वी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारीही बीआरएसमध्ये सामील झाले आहेत. के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये शेती व शेतकर्‍यांच्या विकासासाठी भरीव काम केले आहे. याचाच प्रभाव प. महाराष्ट्रात विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांवर पडला आहे. सातारा जिल्ह्यात ज्या पद्धतीने बीआरएसची बांधणी सुरू आहे त्यावरून शेतकरी संघटनांचे अन्य पदाधिकारीही लवकरच त्या पक्षात प्रवेश करतील अशी चिन्हे आहेत. त्याचा पहिला झटका बळीराजा शेतकरी संघटनेला बसला आहे. यानंतर अन्य काही शेतकरी संघटनांचे पदाधिकारी बीआरएसमध्ये सक्रिय झाले आहेत. पदाधिकार्‍यांना महत्वाची पदे, जबाबदार्‍या व गावोगाव कार्यक्रम राबवण्यासाठी आर्थिक मदतही केली जात आहे. त्यामुळे पदाधिकारी गावोगावी काम करताना दिसत आहेत. याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार का हे यशावकाश कळेल पण सध्या तरी बीआरएसची हवा आहे.

बीआरएसमध्ये जाण्याची कारणे

  • तेलंगणामध्ये शेतकर्‍यांना खरीप व रब्बी पेरणीसाठी एकरी पाच हजार रुपये. 
  • शेतीसाठी वीज व पाणी मोफत 
  • शेतमालाला सरकारकडून हमीभाव 
  • जन्माला आलेल्या लहान मुलाचे नावे बारा हजार रुपये तर मुलीच्या नावे 13 हजार रुपये ठेव
तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांनी शेती व शेतकर्‍यांसाठी भरीव काम केले आहे. शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी व शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शेतकर्‍यांना सन्मान मिळवून देण्याबरोबर त्याचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. हेच काम महाराष्ट्रात उभे करायचे आहे.
– विश्वास जाधव,
सातारा जिल्हा समन्वयक बीआरएस

Back to top button