सातारा : ‘उंच भरारी’तून ६६ जणांना नोकरी | पुढारी

सातारा : ‘उंच भरारी’तून ६६ जणांना नोकरी

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दैनिक ‘पुढारी’ने बाल गुन्हेगारीविरोधात आवाज उठवल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी यावर प्रभावी उपाययोजना करत ‘उंच भरारी’ या युवकांसाठी महत्त्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी केली. गेल्या पाच महिन्यांमध्ये शेकडो युवक, युवती यांना मोफत प्रशिक्षण उपलब्ध केले. यातून 66 युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असून सातारा जिल्ह्यातील बाल गुन्हेगारी निर्मूलनाला सुरुवात झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील युवकांवर योग्य मार्गदर्शन, संधी व साधनांअभावी किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार झाले आहेत. अशा क्षेत्रातील युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, खेळ, रोजगार अशा तरतुदी करत पोलिस दलाने ‘उंच भरारी’ ही योजना त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत राबवली. सुरुवातीला जिल्ह्यातील 15 ते 30 या वयोगटातील युवक व त्यांचे पालक यांच्याशी पोलिसांनी संवाद साधला. युवकांना त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करुन देणे. तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे निश्चित करुन नोकरी देण्यावर भर ठेवला.

फेब्रुवारी 2023 पासून सातारा, कोरेगाव, वाई, कराड, फलटण, पाटण या पोलिस उपविभागीय कार्यालय स्तरावर युवकांना एकत्र आणण्यात आले. याठिकणी विविध संस्थामधील मान्यवरांचे शिबिर घेण्यात आले. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्या माध्यमातून युवकांना दुचाकी रिपेअरिंग मॅकेनीकल, चारचाकी रिपेअरिंग मॅकेनीकल, हॉटेल मॅनेजमेंट, वेल्डींग, प्लंबिंग, असिस्टंट इलेक्ट्रीशियन या कोर्सच्या प्रशिक्षणाकरता सातारा जिल्ह्यातून उंच भरारीच्या माध्यमातून कोल्हापूर, भोर, अहमदनगर, संभाजीनगर येथे कोर्सेचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार मारुती सुझुकी, होंडा, रॉयल इनफिल्ड या कंपनीमध्ये युवकांना 12 ते 19 हजार रुपयांपर्यंतच्या मानधनावर नोकरी मिळाली आहे.

सातारा पोलिस दलातर्फे एकूण 255 प्रशिक्षणार्थींना पाठवण्यात आले असून एकूण 56 युवक व युवतींना नोकरी मिळाली आहे. दि. 1 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणासाठी असलेल्या युवकांसोबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर नोकरीला लागलेल्या युवकांसोबत संवाद साधला.

Back to top button