किराणा दुकानातही भरता येणार आता वीज बील | पुढारी

किराणा दुकानातही भरता येणार आता वीज बील

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  वीज बिल भरण्यासाठी आता नागरिकांना महावितरण कार्यालयात अथवा बँकेतील रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ग्राहकांना घरगुती वीज बिल किराणा दुकानातही भरता येणार आहे. परंतु, यासाठी किराणा दुकानदाराला महावितरणकडे अर्ज करून डिजिटल पेमेंट वॉलेट घ्यावे लागणार आहे.

महावितरणने वीज ग्राहकांसाठी ऑनलाईन वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे ग्राहकांना संगणक अथवा मोबाईलवरून हवे तेव्हा वीज बिल भरता येते. मात्र, ज्या नागरिकांना ऑनलाईन प्रणालीचा वापर करता येत नाही, त्यांना महावितरण कार्यालयात अथवा बँकेत जाऊनच वीज बिल भरावे लागते. त्यामुळे मनस्ताप तर होतोच, शिवाय वेळही वाया जातो. ही परवड थांबवण्यासाठी महावितरणने ग्राहकांसाठी आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

वीज ग्राहकांना किराणा दुकानात देखील वीज बिल भरता येणार असून यासाठी संबंधित दुकानदाराला डिजिटल पेमेंट वॉलेट घ्यावे लागणार आहे. या वॉलेटमध्ये किमान पाच हजार रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजे महावितरणच्या या डिजिटल वॉलेटमध्ये पैसे भरणा करून दुकानदारांना वीज बिल भरून घेता येणार आहे.

असे भरता येणार बिल…

ग्राहकांना महावितरणकडून दर महिन्याला वीज बिल दिले जाते. तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बिलाचा मेसेज पाठवला जातो. हे बिल किंवा मेसेज दाखवल्यास दुकानदाराकडून वीज बिल भरले जाईल, पावतीही दिली जाणार आहे.

Back to top button