सावधान… पसरणी घाटात टपून बसलाय कडा; दरडी कोसळण्याचा धोका | पुढारी

सावधान... पसरणी घाटात टपून बसलाय कडा; दरडी कोसळण्याचा धोका

वाई; पुढारी वृत्तसेवा :  पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरा पासून ते दत्तमंदिरापर्यंत अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांसह पर्यटकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे ‘महाबळेश्वर-पाचगणीला जाताय… सावधान’ अशी परिस्थिती ओढवली आहे. याप्रश्नी संबंधीत यंत्रणेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वाईपासून पाचगणीपर्यंत 13 किलोमीटरचा प्रवास घाटातूनच करावा लागतो. वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात नेहमीच दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असते. परंतु, संबंधित बांधकाम विभाग अतिशय तत्परतेने दरडी हटवण्याचे काम करत असतात. ही जमेची बाजू असली तरीही दरडी कोसळण्याची वाट पहात बसणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. सध्या जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः लक्ष घालून दरडी कोसळण्याची ज्या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे तेथील दरड काढून घेण्याचा आदेश संबंधित विभागाला दिला आहे. बांधकाम विभागाने पसरणी घाटात पाच ते सहा ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणची दरड काढून घेण्यात येऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे.

तसेच दररोज या घाटातून शाळेला जाणारे विद्यार्थी, चाकरमानी, बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदी करणारे व्यापारी यांची संख्या मोठी आहे. त्यांना व प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. धोकादायक दरडींचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. बांधकाम विभागाने त्वरित राज्य शासनाकडे पाठपुरावा करून दरडी हटविण्यासाठी निधीची मान्यता घ्यावी. विलंब न करता धोकादायक दरडी काढून टाकण्याची मागणी जोर धरत आहे.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

पसरणी घाटातील प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. दरडी कोसळण्याची भीती आहे. मात्र, दुर्घटना घडेपर्यंत यंत्रणेने वाट पाहू नये. केवळ निधी नसल्याचे तुणतुणे वाजवण्यापेक्षा ठोस उपाययोजनांसाठी निर्णायक हालचाली करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री तसेच आ. मकरंद पाटील यांनी याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : 

  • पुणे : दहशतवाद्यांनी वापरलेला ड्रोन एटीएसला सापडला
  • 2000 notes back in banking system : २ हजार रुपयांच्या ८० टक्के नोटांची बँकवापसी
  • राहत्या घरात कोब्रा जातीच्या नागाची ५ पिल्ले! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | Cobra Cub 

Back to top button