सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणे निम्म्यावर | पुढारी

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणे निम्म्यावर

सातारा, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पावसाचा जोर आणखी वाढला आहे. कोयना धरणात 54 टीएमसी पाणीसाठा झाला असून, जिल्ह्यातील प्रमुख धरणांनी पन्नाशी पार केली आहे. 11 मोठ्या व मध्यम पाणी प्रकल्पांमध्ये सुमारे 94 हजार क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पांत 157.48 टीएमसी पैकी 81.64 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, धरणे भरण्यासाठी अजून पावसाची आवश्यकता आहे.

जिल्ह्याला प्रतीक्षा लागून राहिलेल्या पावसाने पश्चिम भागात दमदार हजेरी लावली. त्यामुळे कास धरण, वेण्णा लेक हे पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असलेले प्रकल्प लवकर ओव्हरफ्लो झाले. मात्र, जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांसाठी जादा पावसाची आवश्यकता होती. गेल्या दोन-चार दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारसाठी रेड अलर्ट जारी केल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्यामुळे पाणी प्रकल्पांमध्ये पाण्याची मोठी आवक सुरू आहे.

कोयना धरणात 60 हजार 396 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून 58.81 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धोम धरणात 8 हजार 538 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून 6.48 टीएमसी पाणीसाठा आहे. धोम बलकवडी धरणात 1 हजार 699 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक व 3.36 टीएमसी पाणीसाठा आहे. कण्हेर 8 हजार 53 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून 4.70 टीएमसी पाणीसाठा आहे. उरमोडी धरणात 4 हजार 50 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून 4.73 टीएमसी पाणीसाठा आहे. तारळी धरणात 4 हजार 928 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून 5.03 टीएमसी पाणीसाठा आहे. या मोठ्या प्रकल्पांत सर्व मिळून 140.86 पैकी 78 टीएमसी पाणीसाठा झाला असून त्याची टक्केवारी 55.38 इतकी आहे.

मध्यम प्रकल्पांत अपवाद वगळता पाणीपातळी अतिशय खालावली आहे. 10 पैकी 5 धरणांमध्येच पाण्याची आवक सुरू आहे. त्यामध्ये वांग-मराठवाडी धरणाची 2.73 टीएमसी क्षमता असून 1.90 टीएमसी पाणीसाठा आहे. हागेघर धरणाची 0.26 टीएमसी क्षमता असून 0.088 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. महू धरणाची 1.10 टीएमसी क्षमता असून 0.871 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. उत्तरमांड धरणाची 0.88 टीएमसी क्षमता असून 0.385 इतकाच पाणीसाठा आहे. मोरणा-गुरेघर धरणाची 1.39 टीएमसी क्षमता असून 0.906 टीएमसी पाणी आहे. नागेवाडी धरणाची 0.23 टीएमसी क्षमता असून त्यामध्ये 0.064 टीएमसी क्षमता आहे. सातारा, जावली आणि पाटण तालुक्यात पावसाचा जोर असल्यामुळे या मध्यम प्रकल्पांमध्ये 6 हजार 142 क्युसेक्स प्रतिसेकंद इतकी पाण्याची आवक सुरू आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पांत 157.48 पैकी एकूण 81.64 टीएमसी पाणीसाठा आहे.

Back to top button