सातार्‍याजवळ सशस्त्र दरोडेखोरांची रेकी | पुढारी

सातार्‍याजवळ सशस्त्र दरोडेखोरांची रेकी

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहरालगत वाढे फाटा येथे अपार्टमेंट व बंगला पाहून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने धारदार कोयत्यांसह टोळी फिरत असल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांना फुटेज दाखवूनही त्यांनी दखल घेतली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवार, दि. 21 रोजी पहाटे सीसीटीव्हीमध्ये हे दरोडेखोर कैद झाले आहेत. वाढे फाटा परिसरात अनेक अपार्टमेंट तसेच बंगले आहेत. शुक्रवारी पहाटे एका अपार्टमेंट परिसरात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे एका वॉचमनच्या लक्षात आले. वॉचमनने सीसीटीव्ही पाहिल्यानंतर काहीजण तोंडाला मास्क घालून पाहणी करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सीसीटीव्ही व्यवस्थित पाहिल्यानंतर दरोडेखोरांच्या हातात धारदार कोयते व चाकू असल्याचे दिसत होते. ही सर्व घटना पाहून वॉचमन घाबरला. पहाटेची वेळ असल्याने वॉचमनने याबाबतची माहिती सोसायटीमधील काही जणांना देण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोर परिसरात काही बंगल्याची पाहणी करत असल्याचे त्यांच्या हालचालीवरुन दिसत होते. सुमारे 5 ते 7 मिनिटे दरोडेखोर एकाच परिसरात फिरत होते. दरोडेखोर कुठे जातात यावर वॉचमनने लक्ष ठेवले. पहाटे नागरिक फिरण्यासाठी जात असल्याने त्यांची लगबग पाहून काही वेळानंतर दरोडेखोर तेथून पसार झाले.

कंपाऊंडच्या तारा तोडल्या…

दरोडेखोर पाचपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले असता त्यांच्याकडे वाहन कोणते होते, हे समजू शकले नाही; मात्र तिघेजण टेहळणी करत असल्याने त्यांच्या सोबत आणखी काहीजण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरोडेखोरांनी एका कंपाऊंडच्या जाळ्या तोडल्या आहेत. यामुळे ते तयारीनिशी आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button