सातारा : मोरेवाडी, सांडवलीतील 43 कुटुंबांचे स्थलांतर

परळी; पुढारी वृत्तसेवा : सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. या भागातील ज्या गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका आहे अशा ठिकाणी लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. तालुक्यातील डोंगरमाथ्यावर असणार्या मोरेवाडीतील 22 तर सांडवली येथील 21 कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. त्यांना गावातच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत.
गेल्या चार वर्षापासून मोरेवाडी, सांडवली, भैरवगड या ठिकाणी अतिवृष्टीमुळे या परिसरातील रस्ते खचले व जमिनीला भेगा पडल्या आहेत. पाण्याचा प्रवाह गावात येऊन पाणी घरात घुसण्याचे प्रकार घडले होते. सध्या रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या ठिकाणीही भूस्खलन होवून अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर या गावांमध्येही कोणतीही आपत्ती येवू नये यासाठी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार राजेश जाधव, मंडलाधिकारी व कर्मचार्यांच्या मदतीने कुटूंबांना सुरक्षित ठिकाणी निवारा शेडमध्ये स्थलांतरीत करण्यात आले.
मोरेवाडी येथे गावाच्या वरच्या बाजूस धोकादायक दगड असून या परिसरात जमीन खचत आहे. स्थानिकांसाठी दिवसभर शेतातील कामे तसेच जनावरे सांभाळल्यानंतर रात्री सुरक्षित ठिकाणी निवाराशेड बांधले आहेत, या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे. सांडवलीतील 22 कुटूंबांची वारसवाडी दावण या ठिकाणी घरकुले उभारण्यात आली असून याठिकाणी त्यांची सोय करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनो, प्रशासनाचे आदेश पाळा…
दरड प्रवणग्रस्त गावातील कुटुंबे गावातच राहतात. प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी गावात आल्यावर त्यांच्यापुढे सुरक्षित ठिकाणी जातात. मात्र, अधिकारी गेले की त्यांच्या पाठोपाठ ही कुटुंबे आपल्या जुन्या घरात जाऊन राहतात, अशी परिस्थिती आहे. मात्र, वेळ कधी कोणती येईल ही सांगता येत नाही. त्यामुळे प्रशासनाचे म्हणणे ऐका व सुरक्षित ठिकाणी रहा, असा सल्ला दिला जात आहे.