सातारा : ‘कोयना’ 45 दिवसांत 263 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती  | पुढारी

सातारा : ‘कोयना’ 45 दिवसांत 263 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती 

गणेशचंद्र पिसाळ

पाटण :  कोयना धरण तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या  45 दिवसांत प्रचंड पाणीटंचाई व आपत्कालीन परिस्थितीवर मात करत तसेच अनेक दिवस तब्बल 1000 मेगॅवॅट क्षमतेचा कोयना चौथा जलविद्युत निर्मिती टप्पा बंद असतानादेखील आत्तापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत 13.536 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. पश्चिम वीजनिर्मिती 5.78 तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या 2.77 अशा एकूण 8.55 टीएमसी पाण्यावर 263.188 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. पाणीटंचाईच्या काळात एकीकडे सिंचनासाठी काटकसरीने पाणीवापर करताना दुसरीकडे अशा आव्हानात्मक परिस्थितीतही वीजनिर्मितीची वाटचाल समाधानकारक आहे.
नव्याने सुरू झालेल्या या तांत्रिक जलवर्षात पहिल्या 45 दिवसांत कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 5.78 टी.एम.सी. पाण्यावर 255.707 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली . गतवर्षी 5.27 टी. एम. सी. वर 236.808 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे 0.51 टी. एम. सी. पाणीवापर जास्त झाल्याने 18.899 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती जास्त झाली आहे. पूर्वेकडे सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. सिंचनासाठी सोडलेल्या 2.77 टी.एम.सी. पाण्यावर 7.481 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या 4.26 टी.एम.सी. पाण्यावर 12.852 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती.  तुलनात्मक यावर्षी 1.49 टी. एम. सी. पाणीवापर कमी झाल्याने 5.371 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.
चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता आत्तापर्यंत एकूण 8.55 टी. एम. सी. पाण्यावर 263.188 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्याचवेळी गतवर्षी 9.53 टी.एम.सी. पाण्यावर 249.652 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकूण 0.98 टिएमसी पाणीवापर कमी झाला असला तरी  पश्चिमेकडे जादा पाणीवापर झाल्याने यातून 13.536 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. पश्चिम वीजनिर्मितीसाठी वर्षभरात 67.50 टीएमसी पाणी लवादाचा आरक्षित कोटा आहे. धरण निर्मितीनंतर पहिल्यांदाच 2021 मध्ये 82.64 टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी वापरले तर गतवर्षी सिंचनासाठी 36.05 टीएमसी पाणीवापर झाला.

Back to top button