कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे यांच्या मुलाच्या खुनाचा कट आखणार्या चौघांना तळबीड पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. सोमवारी मध्यरात्री पाठलाग करून पोलिसांनी ही कारवाई केली. जेवणाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिस तपासातून समोर आले आहे. प्रीतम चंद्रकांत पाटील (वय 31), सागर अशोक पवार (31), किरण मोहन पवार (31, सर्व रा. वहागाव, ता. कराड) आणि ऋषिकेश अशोक पाटील (22, रा. येणके, ता. कराड) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
बेलवडे हवेली, ता. कराड गावचे हद्दीत प्रीतम पाटील यांनी आनंद हॉटेल चालविण्यास घेतले आहे. या हॉटेलवर 7 जुलै रोजी शिरवडे, ता. कराड येथील माजी उपसभापती सुहास बोराटे यांचा मुलगा आयुष्य सुहास बोराटे हा जेवण करण्यासाठी आला होता. त्यावेळी हॉटेल चालक प्रीतम पाटील व आयुष्य बोराटे यांचा जेवणावरून वाद झाला होती. त्यावेळी आयुष्याने त्याचा भाऊ वेदांत तसेच मित्र बाळू यादव
यांना बोलावून घेऊन आनंद हॉटेलची मोडतोड करत दुचाकीचे नुकसान केले होते. याचा राग प्रीतम पाटील यांना आला होता. त्यानंतर प्रीतम पाटील यांने त्याचे मित्र सागर पवार, कामगार किरण पवार व ऋषिकेश पाटील यांना बरोबर घेत 10 जुलै रोजी शिरवडेत आयुष बोराटे हा एकटाच असून त्याचा खुन करण्याचा कट आखला. त्यानुसार सोमवारी मध्यरात्री सागर पवार याच्या दुचाकहीच्या नंबर प्लेटला राख व माती फासून चौघेही शस्त्रासह शिरवडे येथे जाण्यास निघाले होते. त्याचवेळी तळबीड पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कर्मचारी विनया वाघमारे, हवलदार काका पाटील, प्रदीप पाटील, प्रवीण फडतरे, सनी दिक्षित हे रात्रगस्तीस पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिसांना चौघेही एकाच दुचाकीवर दिसल्याने संशय आला. पोलिसांनी त्यांना दुचाकी थांबवण्यास सांगितली. परंतु त्यांनी दुचाकी भरधाव वेगात नेली. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना तासवडे टोलनाक्याच्या परिसरात पकडले.
दरम्यान, पोलिस त्यांचा पाठलाग करत होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळ असलेले चाकू, कुर्हाड आणि कोयता ही शस्त्रे रस्त्याच्या कडेला टाकून दिली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी शिरवडेत आयुष्य बोराटे याचा खून करण्यासाठी जात असल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत त्यांनी रस्त्यात टाकलेली कुर्हाड, कोयता, चाकू तसेच दुचाकी ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांना तळबीड पोलिस ठाण्यात नेले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर, सपोनी राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकचा तपास हवालदार आप्पा ओंबोसे करीत आहेत.