सातारा : एसटी विभागात 1702 अँड्राईड ई-तिकीट मशिन; फोन पे – गुगल पे वरून देता येणार तिकिटाचे पैसे | पुढारी

सातारा : एसटी विभागात 1702 अँड्राईड ई-तिकीट मशिन; फोन पे - गुगल पे वरून देता येणार तिकिटाचे पैसे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सुट्ट्या पैशावरुन प्रवासी व वाहकांमध्ये होणारे वाद व ईटीआयएम मशिनमध्ये वारंवार होणारा बिघाड लक्षात घेता महामंडळाने अँड्राईड ई-तिकीट मशिन वापर करण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाच्या सातारा विभागात सुमारे 1 हजार 702 अँड्राईड ई -तिकीट मशिन आले असून त्याचे वाटप सर्व आगारांना करण्यात आले आहे. त्यामुळे एसटीचे वाहक आता हायटेक झाले असून प्रवाशांना आता फोन पे, गुगल पे वरूनही तिकिटाचे पैसे देता येणार आहेत.

एसटी बसेसच्या वाहकांना प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी मशिन हँग होणे, बॅटरी प्राब्लेम, वजनाला जड, अशा अनेक अडचणी जुन्या मशिनमुळे निर्माण होत होत्या. त्यामुळे वाहकांना मनस्ताप होत होता. अँड्राईड ई- तिकीट मशिन वायफाय कनेक्ट, वापरायला सुलभ, वजनाला हलकी, बॅटरी बॅकअप चांगले आहे. त्यामध्ये ग्रुप तिकिटांची देखील सुविधा आहे. तसेच मशिनमध्ये ऑनलाईन पेमेंटची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या वाहकाच्या हाती आधुनिक अँड्राईड ई- तिकीट मशिन असल्याने व्यवहार सुटसुटीत होणार आहे. प्रवाशांचे वाहकांशी सुट्ट्या पैशावरुन नेहमी होणारे वादविवाद मिटणार आहेत.

सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, फलटण, पारगाव-खंडाळा, जावली, दहिवडी, वडूज या 11 आगारातील वाहकांना 1 हजार 702 अँड्राईड ई-तिकीट मशिनचे वाटप करण्यात आले आहे. या वाहकांना अँड्राईड ई-तिकीट मशिन वापरण्याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

झटपट तिकिट बुकिंगमुळे प्रवाशी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एसटी वाहकाला अतिरिक्त वेळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे या अँड्राईड ई तिकीट मशिनमुळे मोबाईलप्रमाणे विविध सुविधा असल्यामुळे प्रवासी एटीएम व अन्य अ‍ॅपच्या माध्यमातून वाहकास तिकिटाचे पैसे देऊ शकतील.
– रोहन पलंगे, विभाग नियंत्रक

Back to top button