आदल्या दिवशी अजितदादांसोबत, दुसर्‍या दिवशी शरद पवारांच्या गाडीत; आ. मकरंद पाटील यांच्या भूमिकेने कार्यकर्ते बुचकळ्यात | पुढारी

आदल्या दिवशी अजितदादांसोबत, दुसर्‍या दिवशी शरद पवारांच्या गाडीत; आ. मकरंद पाटील यांच्या भूमिकेने कार्यकर्ते बुचकळ्यात

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर सातारा जिल्ह्यातही दुफळी निर्माण झाली असून, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये फूट पडली. पक्षाच्या आमदारांनी कुणी सावध तर कुणी उघडपणे भूमिका घेतली. वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत हजेरी लावली. मात्र दुसर्‍याच दिवशी सोमवारी त्यांनी खंडाळ्यात महामार्गावरच खा. शरद पवार यांचे जोरदार स्वागत करत त्यांच्या कराड, सातार्‍यातील सर्व कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. त्यामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले.

उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी रविवारी भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सामील होत स्वत:सह पक्षाच्या 9 आमदारांचाही शपथविधी घडवून आणला. तत्पूर्वी अजित पवार यांनी देवगिरी या आपल्या बंगल्यावर पक्षाच्या आमदारांची बैठकही घेतली होती. या बैठकीला आ. मकरंद पाटील यांनी हजेरी लावली. त्यामुळे मकरंदआबा अजितदादांसोबत असल्याच्या चर्चांना उधाण आले.

राष्ट्रवादीच्या मंत्रीमंडळात आ. मकरंद पाटील यांचा समावेशही होणार होता. अजित पवार व मकरंद पाटील यांची तशी चर्चाही झाली. विशेष म्हणजे या चर्चेत विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर हेही उपस्थित होते. आ. मकरंद पाटील शपथ विधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे व्हिडीओ सुद्धा कार्यकर्त्यांनी व्हायरल केले. त्याचे पडसाद वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात उमटले. अनेक पदाधिकार्‍यांनी ‘मकरंदआबा जिकडे आम्ही तिकडे’ असे स्पष्ट केले. काहींनी सावध प्रतिक्रिया देत मकरंदआबा यांनी बैठक बोलावली असून त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे म्हटले. तर काहींनी आ. मकरंदआबांनी खा. शरद पवार यांच्यासोबतच रहावे, अशी थेट भूमिका घेतली. आ. मकरंदआबा अजितदादांसोबतच असल्याचा अनेकांचा कयास होता. वृत्तवाहिन्यांवरुन अजितदादांसोबत असलेल्या आमदारांच्या यादीत आ. मकरंद पाटील यांचे नाव सतत दाखवत होते.

शनिवारी रात्री अजितदादांसोबत भोजन केलेल्या रविवारी दुपारपर्यंत अजितदादांसोबत राहिलेल्या आ. मकरंद पाटील यांनी अजितदादांना चकवा देत सोमवारी मात्र शरद पवार यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यात शरद पवारांचे त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत जोरदार स्वागत केले. एवढेच नाही तर आ. मकरंद पाटील पवारांबरोबर कराडपर्यंत गेले. कराड व सातार्‍यातील शरद पवारांच्या सर्व कार्यक्रमांना त्यांनी जाहीर हजेरी लावली. प्रत्येकवेळी पवारांच्या आसपास असणारी त्यांची उपस्थिती व देहबोली यामुळे ते शरद पवारांसोबतच असल्याचेही दिसले.

जिल्ह्याच्या सीमेवर खा. शरद पवार यांचे स्वागत

नायगाव : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार हे कराड येथे जात असताना जिल्ह्याच्या सीमेवर शिंदेवाडी, ता. खंडाळा येथे जंगी स्वागत करण्यात आले. जिल्ह्याच्या सीमेवर फुलांची उधळण आणि पुष्पहार घालून खा. शरद पवार यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. यावेळी ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, आ. मकरंद पाटील, माजी जि.प. अध्यक्ष उदय कबुले, मनोज पवार, राजेंद्र तांबे, डॉ.नितीन सावंत, उपसरपंच ताहेर काझी, हणमंतराव सांळुखे, अजय भोसले, आदेश भापकर, अमीर काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदेवाडीनंतर खंडाळ्यातही शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Back to top button