

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत केलेल्या बंडाळीनंतरही सातार्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच करिष्मा कायम असल्याचे सोमवारी पहायला मिळाले. त्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्याच्या सीमेपासून पुढे सातार्यातील सर्किट हाऊसपर्यंत शरद पवारांचाच जलवा दिसून आला. कार्यकर्त्यांची प्रचंड झुंबड, पदाधिकार्यांची भेटण्यासाठी रस्सीखेच, फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी असा त्यांच्या करिष्म्याचा सिलसिला सातार्याने पक्षातील फाटाफुटीनंतरही अनुभवला.
सातारा जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. या जिल्ह्यातील जनता कायमच पवारांच्या पाठीशी राहिली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पवारांच्या सातार्यातील पावसाच्या सभेने राज्याच्या राजकारणातील सत्तास्थानाला हादरे दिले होते. दरम्यानच्या काळात पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जेव्हा ते सातार्यात आले तेव्हा तितक्याच दणक्यात त्यांचे स्वागत झाले होते. मात्र, रविवारी त्यांचेच पुतणे व राष्ट्रवादीचे खमके नेते आ. अजित पवार यांनी बंडाचे निशान फडकावत भाजप-शिवसेनेच्या सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या अन्य 8 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीला सातारा जिल्ह्यातील पक्षाचे काही आमदारही हजर होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची सोमवारी सातार्यात झालेली एंट्री तितकीच जल्लोषी ठरली.
सातार्यात शासकीय विश्रामगृह येथे शरद पवार यांचे आगमन झाले. जिल्हा परिषद चौक ते विश्रामगृह परिसरात रस्त्याच्या दुतर्फा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उभे राहून शरद पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो.., पवारसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो.., महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार… शरद पवार..', अशी जोरदार घोषणाबाजी केली. शासकिय विश्रामगृहात पवार यांच्या वाहनांचा ताफा आल्यानंतर एकच गर्दी झाली होती. खा. पवार हे शासकिय विश्रामगृहातील दालनात दाखल होत असताना त्यांनी विश्रामगृहाच्या गेटवर उभे राहून हात उंचावताच एकच जल्लोष झाला.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. रोहित पवार, सारंग पाटील, सत्यजित पाटणकर, प्रभाकर देशमुख, अमित कदम, दीपक पवार, संजूबाबा गायकवाड, नितीनदादा भिलारे, तेजस शिंदे, राजकुमार पाटील, समिंद्रा जाधव, स्मिता देशमुख, शशिकला देशमुख उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांचे महामार्गावर वाढेफाटा येथेही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना भेटण्यासाठी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी व महिलांची रिघ लागली होती.
शासकीय विश्रामगृह परिसरात राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यात तरुणांपासून वयोवृध्द दिसून आले. यामध्ये अनेकांनी सदैव साहेबांसोबत असणार असे फलक झळकवले. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पक्षात उभी फूट पडल्यानंतरही त्यांच्या लोकप्रियतेत तसूभरही फरक पडला नसल्याचे दिसून आले.