राजकीय भूकंपाचे हादरे खटावला बसलेच नाहीत; लाईट नसल्याने मंत्र्यांचा शपथविधी, दादांचे बंड जाणवलेच नाही | पुढारी

राजकीय भूकंपाचे हादरे खटावला बसलेच नाहीत; लाईट नसल्याने मंत्र्यांचा शपथविधी, दादांचे बंड जाणवलेच नाही

खटाव; पुढारी वृत्तसेवा :  राज्याच्या राजकारणात रविवारी मोठा भूकंप झाला. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील 30 आमदारांनी बंड करुन ते ध्याच्या युती सरकारमध्ये सामील झाले. लागलीच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची व इतर आठ जणांनी मंत्रीपदाची शपथही घेतली. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना खटावमध्ये नेहमीप्रमाणे लाईट गेल्याने गावकर्‍यांना राजकीय भूकंप लवकर जाणवलाच नाही.

रविवारी दुपारी साडेबारानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरु झाल्याची कुणकुण लागली होती. जनतेला प्रसिद्धी माध्यमातून राष्ट्रवादीच्या काही आमदारांची अजित पवारांच्या बंगल्यावर बैठक सुरु असल्याचे समजले. बैठक झाल्यावर अजित पवार राजभवनाकडे जाणार असल्याचे सूतोवाच माध्यमे करत असतानाच वातावरण स्वच्छ असतानाही खटावमधील लाईट दुपारी दीड वाजता गेली.

त्यानंतर अजित पवार आणि त्यांच्याबरोबरचे आमदार राजभवनावर गेले. त्या आमदारांमध्ये कुणा कुणाचा समावेश आहे ? कुणाला मंत्रीपदाची शपथ देण्यात आली? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि इतर नेते या विषयावर काय बोलले? या घडामोडींची उत्सुकता असूनही 80 टक्के खटावकरांना काहीच माहित पडले नाही. राज्याच्या राजकारणातील भूकंप होवून सगळे वातावरण जिकडच्या तिकडे झाल्यावर सायंकाळी खटावची लाईट आली.

Back to top button