करहरमध्ये घुमला विठूनामाचा गजर | पुढारी

करहरमध्ये घुमला विठूनामाचा गजर

कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : प्रतिपंढरपूर करहर, ता. जावली येथे आषाढी एकादशी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठलाची महापूजा आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते व आ. शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी विठूरायाच्या जयघोषाने अवघी करहरनगरी दुमदुमली.

करहर येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष केला. महापूजेवेळी करहर येथील तीन वारकरी दांपत्यांनाही विठूरायाच्या पूजेचा मान देण्यात आला. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, तहसीलदार हणमंत कोळेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर, सहा. पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, पुजारी संतोष खिस्ते उपस्थित होते.

धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. काटवली, बेलोशी, दापवडी व पंचक्रोशीतील शेकडो दिंड्या व पालख्या करहर नगरीत दाखल झाल्या. कुडाळ, सोमर्डी, बामणोली, शेते, करंदी येथूनही पालख्या आणि दिंड्या आल्या होत्या. बसस्थानकावर विठ्ठल नामाचा जयघोष करत रिंगण सोहळा रंगला.

Back to top button