संगम माहुली फाटा येथे रास्ता रोको | पुढारी

संगम माहुली फाटा येथे रास्ता रोको

खेड, पुढारी वृत्तसेवा : बाँम्बे रेस्टॉरंट ते संगममाहुली रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे कहाम दीड ते दोन महिन्यांपासून सुरू आहे. अनेक ठिकाणी हे काम निकृष्ट दर्जाचे असून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. काम रखडल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यासाठी रस्त्याचे काम मार्गी लागावे, यासाठी नागरिकांनी गुरूवारी संगममाहुली फाटा येथे रास्तारोको केला.

बाँम्बे रेस्टॉरंट ते संगममाहुली या अवघ्या 3 ते 4 किमी रस्त्याला दीड वषांचा कालावधी लागला आहे. अनेक ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम अपुर्‍या स्थितीत आहे. तर सध्या काम बंद असल्याने पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रोज 30 ते 35 दुचाकी वाहने घसरत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत ठेकेदाराला विचारणा केल्यानंतर फक्त आश्वासने दिली जात आहे. परंतु काम केले जात नाही.

ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण केल्याने, खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. मोठी दुर्घटना झाल्यावर संबंधित ठेकेदार अधिकारी जागे होणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी केली. यावेळी नागरिकांनी सरकार व ठेकेदारा-विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. आंदोलनादरम्यान ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी श्रीकांत घाडगे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. घाडगे यांनी दि. 5 जुलैपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. दिलेल्या वेळेत काम पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. यावेळी संगमनगर, कृष्णानगर, विकासनगर, संगममाहुली, क्षेत्रमाहुली, खावली, सोनगाव सं. निंब, महागाव येथील नागरिक उपस्थित होते.

Back to top button