सातारा : जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायती होणार पेपरलेस | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायती होणार पेपरलेस

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने महा ई- ग्राम संगणक प्रणाली विकसित केली आहेे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे निवड केलेल्या ग्रामपंचायती पेपरलेस होणार असून यासाठी कालबध्द कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सातारा तालुक्यातील 10, कोरेगाव 10, खटाव 10, माण 10, फलटण 10, खंडाळा 10, वाई 10, जावली 10, महाबळेश्वर 10, कराड 10 व पाटण तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ही संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामसेवकांचे कामकाज हे ऑनलाईन होणार आहे. तसेच कार्यालयांमधील कागदपत्रांचा ढीग कमी होणार आहे. यामुळे कर्मचारी व नागरिकांचा पैसा व वेळेत बचत होणार आहे.

महा-ई ग्राम ही प्रणाली राबवण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यासाठी तालुका स्तरावर समन्वय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेळापत्रकाप्रमाणे दिलेल्या कार्यक्रमाची जबाबदारी ग्रामपंचायतीचे केंद्रचालक, ग्रामसेवक व संबंधित विस्तार अधिकार्‍यांची राहणार आहे. निवड केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यवाही पूर्ण केल्यानंतर या ग्रामपंचायती दि. 2 ऑक्टोबर रोजी पेपरलेस ग्रामपंचायती म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली.

या मिळणार सुविधा
निवड केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये संगणक प्रणालीमध्ये ग्रामपंचायतीकडील 1 ते 33 नमुने संगणीकृत करणे, स्वयंघोषणापत्रे व 1 ते 7 प्रकारचे दाखले देणे, मासिक प्रगती अहवाल, मुलभूत माहिती इत्यादी सुविधा प्रामुख्याने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संगणक प्रणालीचा वापर सर्व ग्रामपंचायतीमध्ये सुरू करावयाचा आहे. सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, केंद्र चालक, विस्तार अधिकारी पंचायत यांचे प्रशिक्षण त्या त्या तालुक्यात घेण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीमध्ये महा ई-ग्राम संगणक प्रणालीच्या कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. यामध्ये हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरूद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.
– ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

Back to top button