सातारा : सोळशी खोर्‍यात 6.5 टीएमसीचे धरण; दीड महिन्यात पीएफआर अहवाल | पुढारी

सातारा : सोळशी खोर्‍यात 6.5 टीएमसीचे धरण; दीड महिन्यात पीएफआर अहवाल

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर तालुक्यात सोळशी येथे 6.5 टीएमसीचे धरण बांधले जाणार आहे. जलसंपदा विभागाच्या सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाकडून सोळशी धरणाचा सर्व्हे सुरू असून दीड महिन्यांत प्राथमिक सर्व्हे करून पूर्व संभाव्यता अहवाल (पीएफआर) राज्य शासनास सादर केला जाणार आहे.

सातार्‍याच्या पश्चिम भागात मोठे, मध्यम पाणी प्रकल्प आहेत. बहुतांश धरणांची कामे होत आली आहेत. मात्र, तरीही जिल्ह्याचा दुष्काळ संपलेला नाही. या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाणी प्रकल्पासाठी बर्‍याच साईट्स आहेत. महाबळेश्वर तालुक्यात सोळशी गावाजवळ पाणी प्रकल्पासाठी एक महत्त्वाची साईट्स सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाने शोधली आहे. हा प्रकल्प झाल्यास यासाठी खर्चाच्या तुलनेत याठिकाणी मोठा पाणीसाठा निर्माण होऊ शकतो, हे स्पष्ट झाल्यानंतर या धरणासाठी आवश्यक इतर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प पूर्णत्त्वाला जावा यासाठी लक्ष घातले. जलसंपदा विभागाला सूचना केल्या. त्यानंतर सोळशी धरणाच्या प्रकल्पाच्या प्राथमिक सर्व्हेचे काम सुरू झाले. हे काम दीड महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर या पाणी प्रकल्पासाठी पूर्व संभाव्यता अहवाल (पीएफआर) राज्य शासनास सादर करून त्यास मंजुरी घेतली जाणार आहे. पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी नाशिक येथील जल विज्ञान विभागाची परवानगी मिळाल्यानंतर या पाणीप्रकल्पाचे विस्तृत सर्व्हेक्षण होईल.

या सर्व्हेक्षणात प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल. हा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) शासनास मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया शक्य तितक्या गतीने व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. नियोजित सोळशी प्रकल्पात सुमारे 6.5 टीएमसी पाणीसाठा निर्माण होऊ शकतो. त्यासाठी सुमारे 3 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सोळशी धरणाची माहिती मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी नुकतीच जिल्हा दौर्‍यावर असताना घेतली. प्राथमिक सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर त्यापुढील पूर्व संभाव्यता अहवालास मंजुरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यावेळी जलसंपदा विभागाचे अव्वर मुख्य सचिव दिपक कपूर, जलजीवन मिशनचे सचिव अमित सैनी, पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता अमर काशिद आदि उपस्थित होते.

Back to top button