सातारा : ‘बांटा’ गोळी करतेय गुन्हेगारीकडे प्रवृत्त; नशेमुळे जीव घेण्यापर्यंत मजल | पुढारी

सातारा : ‘बांटा’ गोळी करतेय गुन्हेगारीकडे प्रवृत्त; नशेमुळे जीव घेण्यापर्यंत मजल

विठ्ठल हेंद्रे

सातारा :  अल्पवयीन मुले व गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक ‘बांटा’ ही गांजाची गोळी सेवन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गोळीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असून जीव घेण्यापर्यंत नशेबाजांची मजल जात असल्याने ही बाब चिंतेची आहे. 100 रु. पासून या गोळ्यांची किंमत असून त्या सातार्‍यासह अन्यत्रही चोरीचुपके उपलब्ध होत आहे.

सातार्‍यासह अनेक ठिकाणी छुप्या पध्दतीने गांजाची सर्रास विक्री होत असते. गुन्हेगारांकडून अमली पदार्थाचे सेवन केले जात असून गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी लागणारे डेअरिंग अमली पदार्थाचे सेवन केल्यावर येत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. व्हाईटनर, दारू यापेक्षा गांजाची ‘बांटा’ गोळी खाल्ल्यानंतर अधिक डेअरिंग येते, असा समज युवकांमध्ये वाढत आहे. त्यामुळे गांजाची बांटा गोळी सध्या सातार्‍यात तेजीत असल्याचे वास्तव आहे. ही गोळी खाल्यानंतर सुमारे तासाभरात संबंधिताची मती गुंग होते. ही गोळी खाणार्‍याला आपण काय करतो हे कळत नाही. गोळी खाल्ल्यानंतर येणार्‍या नशेतून गुन्हेगारीकडे कल वाढत असल्याचे समोर आले आहे.
गांजाची गोळी ऐवजी बांटा गोळी हा कोडवर्ड म्हणून वापरण्यास गुन्हेगारांना सोयीचा असल्याची चर्चा आहे. या गोळीबाबत अधिकृत काहीही माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे पोलिस यंत्रणेपुढेही आव्हान उभे राहिले आहे.

पोलिस तपासातही ‘मोडस’ ओपन..

सातारा शहरातील वाढत्या गुन्हेगारीला बांटा गोळीचा हातभार लागला आहे. गुन्हेगारी घटना घडल्यानंतर पोलिस बदमाशांना पकडत आहेत. संशयितांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर बांटा गोळीच्या नशेमध्ये असल्याने त्यातून कृत्य केल्याची कबुली दिली जात आहे. नशेबाबत पोलिसांनी अधिक माहिती घेतल्यानंतर गांजाची बांटा गोळी घेतली गेली जात असल्याचेही समोर आले आहे. ही गोळी खाल्ल्यानंतर किमान 48 तास नशेचा प्रभाव राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, बांटा गोळीची बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथे क्रेझ असल्याची चर्चा आहे.

गांजापासून तयार होतेय गोळी…

बांटा गोळी ही केमिकल विरहीत असल्याचे गुन्हेगारी क्षेत्रातून सांगण्यात येतेे. ओल्या गांजाच्या पुडीपासून त्याचे मिश्रण बनवून बांटा गोळी तयार केली जात आहे. ही गोळी पाणी, दूध, ज्युस यामध्ये मिक्स करून तसेच जिभेच्या टाळ्याखाली ठेवूनही थेट घेतली जात आहे. या गोळ्या टपर्‍यांसह गुन्हेगारी वर्तुळात असणार्‍यांकडे उपलब्ध होत असल्याची माहिती मिळत आहे.

Back to top button