

येळगांव : पुढारी वृत्तसेवा येळगाव ता. कराड येथे काल (शुक्रवार) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी सात ठिकाणी घरफोडी करुन रोकड, सोने चांदीच्या दागिन्यांसह नवीन कपड्यांवर डल्ला मारला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पोबारा केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील सोनेचांदीचे व्यापारी वर्दीचंद नवलमन गांधी, झुंजार बाजीराव पाटील, डॉ. आनंदा बाळू सोरटे, तानाजी बापूराव मस्कर, पोपट गणपती पाटील, विजयकुमार भगवान पाटील, आनंदा राजाराम पाटील यांच्या घरांची समोरच्या बाजूने मुख्य दरवाजांची कुलुपे कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र त्यापूर्वी शेजारच्या घरांमधील लोकांनी बाहेर येऊ नये म्हणून त्यांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या. तद्नंतर संबंधित घरातील कपाटे, तिजोरीवर प्रहार करीत कपाटातील सोनेचांदीचे दागिने, रोकड तसेच मोल्यवान वस्तू घेऊन अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पोबारा केला. यामुळे येळगांवमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे घटना घडली त्यादरम्यान विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. त्यामुळे लाईट नेमकी वरून गेली होती, की चोरट्यांनीच वीजपुरवठा खंडित करून आपला कार्यभाग साधला अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे. पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
हेही वाचा :