सातारा : बकरी बाजारात कोट्यवधीची उलाढाल | पुढारी

सातारा : बकरी बाजारात कोट्यवधीची उलाढाल

लोणंद; पुढारी वृत्तसेवा :  लोणंद बाजार समितीच्या आवारातील बोकड व बकरीच्या गुरुवारच्या बाजारात व्यापारी व शेतकर्‍यांनी गर्दी केली होती. पुढील आठवड्यात होणार्‍या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीला जत्रेचे स्वरूप आले होते. या बाजारात बकरी खरेदी-विक्री व्यवहारात कोट्यवधींची उलाढाल झाली.

लोणंद बाजार समितीच्या बकरी व बोकड, जनावरे बाजारात चांगलीच गर्दी झाली होती. पहाटे पाचपासून बाजार आवारावर दुचाकी, चार चाकी व ट्रकमधून शेळी, मेंढी, बकरी व बोकड यांची मोठी आवक सुरू होती. बाजारात बकरी व बोकडांची सुमारे पाच, दहा, पंधरा ते वीस हजारापर्यंत किंमती गेल्या होत्या. एका बोकडाची किंमत एक लाखापेक्षा जास्त गेली होती. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा बाजार फुल्ल झाला. मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याने सुमारे 3 ते 4 कोटींची उलाढाल झाल्याचे सभापती सुनील शेळके-पाटील यांनी सांगितले. या बाजारात बकरी व बोकड खरेदीसाठी कर्नाटक, गोवा, राज्यासह हुबळी, धारवाड, बेंगलोर, कोकणातील महाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आदी भागातील सुमारे 15 ते 20 हजार खरेदीदार व्यापारी आले होते.

Back to top button