राजेंच्या भांडणाकडे फडणवीसांचा कानाडोळा | पुढारी

राजेंच्या भांडणाकडे फडणवीसांचा कानाडोळा

कराड, पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यातील बाजार समितीच्या जागेवरून बुधवारी खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या भांडणाकडे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी कानाडोळा केला आहे. खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत विकासकामांबाबत निवेदने दिली आहेत. सातार्‍यात फार गंभीर घडले आहे असे नाही. अशा गोष्टी होतच असतात, असे सांगत या प्रकरणावर अधिक भाष्य करणे टाळले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी मध्यरात्री मलकापूर (कराड) येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या विश्रामगृहात दाखल झाले. त्यानंतर गुरूवारी सकाळी जिल्ह्यातील भाजपा नेत्यांसह खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्रपणे समर्थकांसमवेत भेट घेतली. बुधवारी सातारा बाजार समितीच्या कार्यक्रमावरून झालेल्या राडेबाजीनंतर दोन्ही राजे व त्यांच्या समर्थकांविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या भेटीकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

खा. उदयनराजे भोसले हे सकाळी आठ वाजण्यापूर्वीच कृष्णा विश्व विद्यापीठाच्या विश्रामगृहात दाखल झाले होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, धैर्यशिल कदम, विक्रम पावसकर, डॉ. अतुल भोसले यांच्यासह भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर साडेआठच्या सुमारास आ. शिवेंद्रराजे भोसले हे आपल्या सहकार्‍यांसह दाखल झाले. खा. उदयनराजे भोसले हे चर्चा करत असतानाच आ. शिवेंद्रराजे भोसले दाखल झाले आणि त्यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी खा. उदयनराजे भोसले बैठकीतून बाहेर येत डॉ. अतुल भोसले यांच्यासह भाजपा नेत्यांशी चर्चा करताना पहावयास मिळाले.त्यानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तासाने आ. शिवेंद्रराजे भोसले हे बैठकीतून बाहेर येत डॉ. अतुल भोसले यांचे बंधू विनायक भोसले यांच्यासह धैर्यशिल कदम व अन्य भाजपा नेत्यांशी चर्चा करताना पहावयास मिळाले. दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र या भेटीचा तपशील उपलब्ध होऊ शकला नव्हता.

शासकीय आढावा बैठकीनंतर खा. उदयनराजे भोसले यांना याबाबत विचारले असता त्यांनी या बैठकीबाबत कोणतेच भाष्य केले नाही. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी सातार्‍यात आमदार व खासदार गटातील वादाबाबत विचारणा करत काय चर्चा झाली ? असा प्रश्न केला. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या पाठिमागे उभे असलेल्या आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केवळ स्मितहास्य केले. तर उपमुख्यमंत्र्यांनी सातार्‍यातील वाद फारसा गंभीर नाही, असे सांगत अशा गोष्टी कधी कधी होतच असतात असे सांगितले. त्याचवेळी दोन्ही नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांसह सिंचन प्रश्नाबाबत निवेदन दिले आहे. दोन्ही नेत्यांसाठी जनतेचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे असल्याचे सांगत या वादाबाबत अधिक भाष्य करणे टाळले.

उपमुख्यमंत्र्यांची दोन तासाहून अधिक काळ चर्चा…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी साडेसात वाजल्यापासूनच जिल्ह्यातील भाजपा नेत्यांशी विविध विषयावर चर्चा करण्यास सुरूवात केली होती. सकाळी 10 वाजता कृष्णा हॉस्पिटल कॅम्पस येथे भाजपा सातारा जिल्हा कोअर कमिटीची बैठक होणार होती. तर 10.30 वाजता शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांची बैठक होणार होती. मात्र असे असले तरी उपमुख्यमंत्री सकाळी पावणे अकराच्या सुमारास भाजपा नेत्यांशी चर्चा केल्यानंतर नाश्ता करण्यासाठी आले आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी ते शासकीय बैठकीसाठी रवाना झाले.

मंत्रीमंडळ विस्तार होणारच…

राज्य मंत्रीमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल असे स्पष्ट केले.

Back to top button