कांदाटीतील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी उत्पन्नाची साधने वाढवा : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

कांदाटीतील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी उत्पन्नाची साधने वाढवा : मुख्यमंत्री शिंदे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  कांदाटी खोर्‍यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुणे या शहरांकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोर्‍यात पर्यटन विकासाबरोबरच त्यांना वनौषधी, बांबू लागवड करण्यास प्रोत्साहित करुन उत्पन्नाचे नवीन साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरे ता. महाबळेश्वर येथे आपल्या निवासस्थानी घेतलेल्या सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री ना. शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणीसाठ्याची माहिती घेऊन मुख्यमंत्री ना. शिंदे म्हणाले, सद्य परिस्थितीत पाऊस लांबलेला असून कोयना जलाशयातील जलसाठाही कमी झालेला आहे. यामुळे जलाशयात साठलेला गाळ उचलण्याची संधी निर्माण झाली असून गाळ मुक्त धरण योजनेंतर्गत या जलाशयातील गाळ उचलण्यात यावा. यामुळे कोयना जलाशयाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी बांबू लागवड करून शेतकर्‍यांना त्याद्वारे अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

मुख्यमंत्री अचानक हेलिकॉप्टरने दरे गावी

पाचगणी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे बुधवारी अचानक सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दरेला दाखल झाले. यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. बुधवारी दुपारी 2 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर अचानक दरे गावातील हेलिपॅडवर उतरले अन प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यासाठी अधिकार्‍यांची एकच धावपळ उडाली. ना. एकनाथ शिंदे यांच्या आगमनानंतर नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कोल्हापूर विभागाचे पोलिस उपमहानिरिक्षक सुनील फुलारी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अन्य उपस्थित अधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे अचानक गावी येण्यामागचं कारण काय? याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. मात्र, नेहमीच लवाजमा घेवून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी अचानक एकटेच जिल्हा दौर्‍यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Back to top button