सातारा : पोवई नाका सुशोभीकरणाचा वाद पेटला

सातारा : पोवई नाका सुशोभीकरणाचा वाद पेटला
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  पोवईनाका सुशोभीकरणाचा वाद पेटला असून आज विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पोवईनाका नामांतराला तीव्र विरोध दर्शवला. तर जनतेच्या अस्मितेवर घाला घातल्यास हाणून पाडू अशा शब्दांत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले फेसबुकवरून गरजले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंत शेलार यांनी पाठवलेल्या पत्रकात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारकरूपी आयलँड पोवईनाक्यावरील इतर परिसरात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सातार्‍यातील पोवईनाका-शिवतीर्थ परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावाने चौक विकसित करून सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार आहे. याबाबत ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दि. 16 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बोलावलेल्या बैठकीत आढावा घेण्यात येणार असून संबंधित अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवतीर्थाच्या कामावरून अगोदरच दोन राजांमध्ये श्रेयवाद उफाळला असतानाच पोवई नाक्यावरील सुशोभीकरणाचा हा वाद समोर आल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

पोवईनाका परिसरात अन्य काही नको, अशी आक्रमक भूमिका राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी घेऊन शिवतीर्थ परिसराची पाहणी केली. याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज (पहिले) यांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

उदयनराजे फेसबुकवरून गरजले

शिवप्रभूंचा सातरस्ता पोवईनाका येथे असलेले पूर्णाकृती पुतळारूपी शिवस्मारक सर्वांचे प्रेरणास्थान आहे. हे प्रेरणास्थान कायम शिवस्मारक म्हणूनच राहणे आवश्यक आहे. शिवप्रभूंपेक्षा दिगंत किर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे कोणी धाडस करू नये. अधिकार गाजवून, तमाम जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा कोणी हीन प्रकार करत असेल तर तो जनतेच्या माध्यमातून हाणून पाडला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. खा. उदयनराजे म्हणालेत, सातरस्ता म्हणून ओळखला जाणारा पोवईनाका परिसर हे सातारा शहराचे नाक आहे. याठिकाणी युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्मारक आहे. या स्मारकाचे सध्या सर्वांच्या सहकार्याने आणि नगर परिषदेच्या माध्यमातून चांगले सुशोभिकरण होत आहे. सातारकरांनाच नव्हे तर येथून जाणार्‍या-येणार्‍या सर्वांनाच शिवस्मारक परिसर प्रेरणा देणारा आहे. या प्रेरणास्थानाच्या ठिकाणी अन्य काही महापुरूषांचे स्मारक किंवा आयलँड करण्याचा कोणी घाट घालत असेल तर जनतेच्या अस्तितेवरील तो घाला असेल. स्वराज्याचे शिल्पकार शिवप्रभूंचे कर्तृत्व झाकोळले जाईल असे कोणी काही करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जाईल. लोककल्याणकारी शिवप्रभूंची तुलना अन्य कुणाशी होऊ शकणार नाहीच आणि तसा प्रयत्नही कुणी करू नये, अशी माफक अपेक्षा आहे, असेही खा.उदयनराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण

पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनीही पत्रकाद्वारे सुशोभिकरणाच्या मुद्दाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शिवतीर्थ हा परिसर वगळता पोवईनाक्याचा परिसर खूप मोठा व विस्तृत आहे. त्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा स्मारकरूपी आयलँड विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी आढावा बैठक लावण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिलेली आहे. पोवई नाक्यावरील शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारे लोकनेते बाळासाहेब देसाई चौक असे नामकरण करण्याचा कोणताही विचार नाही.

याबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंत शेलार यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहरातील शिवतीर्थ हे सातारकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत असून याबाबत संपूर्ण सातारकरांच्या आदराच्या भावना आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ स्मारकात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने चौक तयार करणे असे कोणतेही काम प्रस्तावित नाही. जिल्हाधिकार्‍यांना पालकमंत्र्यांच्या कार्यालयाने कळवलेल्या पत्रामध्ये पोवईनाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने नवीन आयलँड तयार करण्याबाबत बैठक आयोजित करण्याविषयी नमूद केले आहे. या बैठकीत पोवईनाका परिसरात शिवतीर्थ स्मारक सोडून इतर ठिक़ाणी आयलँड विकसित तयार करण्यासाठीचा आढावा घेण्यात येणार आहे. शिवतीर्थाला लोकनेते बाळासाहेब देसाई चौक असे नामकरण करण्याबाबतचा कोणताही विचार अथवा प्रस्ताव प्रस्तावित नाही. शिवतीर्थ हा परिसर वगळता पोवई नाक्याचा इतर परिसर हा खूप मोठा व विस्तृत आहे. त्याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकरूपी आयलँड विकसित करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, पोवईनाक्यावरील नव्या चौकाला सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. दिशा मंचचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, मनसेचे शहराध्यक्ष राहूल पवार, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, आपचे सागर भोगावकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना, हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी या प्रक्रियेस विरोध दर्शवला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news