सातारा : कोयनेचा बहुतांशी भाग पडला कोरडा | पुढारी

सातारा : कोयनेचा बहुतांशी भाग पडला कोरडा

पाटण; गणेशचंद्र पिसाळ :  कोयना धरणातील पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच कठीण होत चालली आहे. एका बाजूला कोयना जलविद्युत निर्मितीपैकी कोयना चौथा टप्पा हळूहळू पाण्याअभावी अडचणीत येत असतानाच पोफळी येथील टप्पा एक व दोनसाठी पाणीपुरवठा करणारा इंटक टनेलसुद्धा पाण्याअभावी अडचणीत येऊ लागला आहे. धरणालगतच्या अगदी शासकीय लाँचेसदेखील पाण्याअभावी गाळात अडकल्या असून बहुतांशी विभाग आता पाण्याअभावी आटलेला पाहायला व कोरडा पडलेल्या पाहायला मिळत आहे.

कोयना धरणात सध्या उपयुक्त सरासरी सात टीएमसी पाणीसाठा आहे. या पाण्यावर पाऊस पडेपर्यंत सिंचनासह जलविद्युत निर्मितीची प्रमुख जबाबदारी आहे. वास्तविक सध्या धरणाच्या पायथा वीज गृहातून पूर्वेकडे सिंचनासाठी अव्याहतपणे पाणी सोडणे सुरूच आहे. त्यामुळे पूर्वेकडील सिंचनाची मागणी लक्षात घेता त्याचे परिणाम पश्चिमेकडील पोफळी अलोरे, कोयना चौथा टप्पा या जलविद्युत निर्मितीवर होऊ लागल आहे. कोयना चौथा टप्पा हा तब्बल 1000 मेगॅवॅट क्षमतेचा असला तरी पाण्याअभावी सध्या यातून तुरळक वीज निर्मिती करण्यात येत आहे. पोफळी, अलोरे प्रकल्पानांदेखील अपेक्षित पाणीपुरवठा करणे आता हळूहळू अशक्य बनत चालले आहे.

धरणातील एकूण पाण्याचा विचार करता यापुढे जलविद्युत निर्मिती ही अधिकाधिक अडचणीची होत असताना पूर्वेकडे सिंचनाचा पाणी प्रश्नही काही दिवसानंतर गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यासाठी आता तातडीने अपेक्षित पाऊस पडणे ही अत्यंत गरजेचे बनले आहे.

दरम्यान, धरणाची जलपातळी 618 मीटरवर गेल्यानंतर जलविद्युत निर्मितीचा महत्त्वाचा एक हजार मेगॅवॅट क्षमतेच्या कोयना चौथा टप्प्यातील वीजनिर्मिती बंद पडणार आहे. यासाठी आता केवळ दोन मीटर इतकीच जलपातळी शिल्लक असल्याने लवकरच हा संभाव्य धोका देखील सार्वत्रिक घोंगावत आहे.

Back to top button