सातारा : धारदार शस्त्र नव्हे तर ‘खटक्यावर बोट’चे आकर्षण | पुढारी

सातारा : धारदार शस्त्र नव्हे तर ‘खटक्यावर बोट’चे आकर्षण

कराड; अमोल चव्हाण : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडे अवैध पिस्तूल येतात कोठून? याचा तपास आजपर्यंत मुळापर्यंत गेलाच नाही. त्यामुळेच दिवसेंदिवस अवैध पिस्तूल बाळगणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्यातूनच मग गुन्हेगार लाठीकाठी, चाकू, तलवार यासह धारदार शस्त्रांऐवजी आता अवैध पिस्तूल जवळ बाळगून खटक्यावर बोट ठेवण्याचे आकर्षण त्यांच्यामध्ये वाढू लागले आहे. गुन्हेगारांचा हा बदलता ट्रेंड भविष्यासाठी धोकादायक आहे. याचा विचार करून पोलिसांनी अवैध पिस्तूल येते कुठून? ते पुरवत कोण? उत्पादन कोठे होते? त्याला अर्थ पुरवठा कोण करतो? या सर्व बाबींची माहिती घेऊन त्याच्या मुळावरच घाव घालने गरजेचे आहे. तरच या प्रकरणाला आळा बसेल अन्यथा ‘ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे हा प्रकार भविष्यातही असाच सुरू राहील.

जिल्ह्यात सर्वात जास्त कराड उपविभागात अवैध पिस्तूल बाळगणार्‍यांची संख्या असल्याचे आजवर झालेल्या कारवायांवरून स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी 26 मार्च रोजी राजमाची ता. कराड येथे झालेली कारवाई तर राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी कारवाई होती. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कराड पोलिसांच्या मदतीने दहा जणांना पकडून त्यांच्याकडून 14 पिस्तूल व 20 काडतुसे जप्त केली होती. ही कारवाई खरोखरच गुन्हेगारांवर वचक ठेवणारी होती.

एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईनंतर अवैध पिस्तूल बाळगणार्‍यांवर वचक बसेल असे वाटत होते. कराड शहर व परिसरात त्या दृष्टीने गुन्हेगारांमध्ये वचक बसल्याचे काही प्रमाणात दिसूनही आले. अवैध पिस्तूल जवळ बाळगल्यास पोलीस कारवाई करतात, हा संदेश गुन्हेगारी क्षेत्रात फिरू लागला. त्यामुळे शहरी भागातील अवैध पिस्तूल बाळगणे, त्याची खरेदी-विक्री करण्याचे लोन काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत असले तरी ते लोन हळूहळू ग्रामीण भागात पसरू लागले. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले.

कराडचा पदभार स्वीकारल्यानंतर डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी प्रथम त्या दृष्टीने माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यानुसारच त्यांना कराडच्या ग्रामीण भागातून येऊन अवैध पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने कराड शहरात काही जण फिरत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून त्यांनी पोलिसांचे पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसारच मग शनिवारी पोलिसांनी बस स्थानक परिसरात अवैध पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या वाघेश्वर मसूर तालुका कराड येथील युवकाला अटक केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस आणखीही एक दोघांना ताब्यात घेतील. मात्र भविष्यात अशा स्वरूपाच्या घटना घडणारच नाहीत त्या दृष्टीने डीवायएसपी अमोल ठाकूर काय कारवाई करतात? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

गुन्हेगारी घटना घडत असताना अनेक वेळेला लाठ्या, काठ्या, चाकू, कोयता, तलवार अशा हत्यारांचा वापर होत होता. परंतु अलीकडे रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह गुंडांच्या कमरेला पिस्तूल दिसू लागली आहेत. बेकायदा पिस्तूल जवळ बाळगून त्याचा धाक दाखवत अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत. अवैध पिस्तूल जवळ बाळगून कराड शहर व परिसरात गुंडांनी हल्ले केल्याचे यापूर्वी अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळेच एखादी गुन्हेगारी घटना घडल्यानंतर पोलिस त्याबाबत कारवाया करतात; पण त्याचे पुढे काय होते हे समजत नाही.

‘त्या’प्रकरणाचे पुढे काय झाले?

कराड तालुक्यातील राजमाची येथे एकाच वेळी कारवाई करून दहा संशयतांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 14 अवैध पिस्तूल व वीस काडतुसे जप्त केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले होते. त्यानुसार तपास करत असताना पोलिस पिस्तूल बनवत असलेल्या मध्यप्रदेशातील ठिकाणापर्यंत पोहोचले. अवैध पिस्तूल पुरवणार्‍याची माहिती मिळवली. परंतु तो सापडत नाही, त्याचा शोध सुरू आहे, एवढेच पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची कारवाईही थांबली की काय? त्याचे पुढे काय झाले? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Back to top button