Karad Accident : कराडजवळ अपघात! एका मागून एक पाच कार धडकल्या | पुढारी

Karad Accident : कराडजवळ अपघात! एका मागून एक पाच कार धडकल्या

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड येथील पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पाच कार एकमेकांना धडकल्याची घटना घडली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवार (दि. १०) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत महेंद्र हॉटेलजवळ सातारा बाजूकडून कराड बाजूकडे भरधाव वेगात वाहने येत होती. अचानकपणे एका कार चालकाने ब्रेक मारल्याने त्या कारच्या पाठोपाठ असलेल्या चार कार एकमेकांवर आदळल्या. या अपघातात अनेक कारच्या पुढील भागाचे तसेच बाॅनेटचे व पाठीमागील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळताच वाहतूक शाखेच्या सपोनी सरोजिनी पाटील या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी अपघातानंतर महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान पुढील वाहन चालकांनी ब्रेक का मारला याची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा

Back to top button