राज्यात प्रथमच ‘स्पोर्टस् अ‍ॅप’; क्रीडा कार्यालय हायटेक | पुढारी

राज्यात प्रथमच ‘स्पोर्टस् अ‍ॅप’; क्रीडा कार्यालय हायटेक

सातारा; विशाल गुजर :  केंद्र असो की राज्य सरकार खेळाडूंपर्यंत पोहचत नाही, खेळाडूंना सुविधा मिळत नाहीत, अशी नेहमीच ओरड होते. अधिकाधिक खेळाडूंपर्यंत पोहोचता यावे यासाठी सातारच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथमच स्वतःचे सातारा स्पोर्टस् अ‍ॅप तयार केले आहे. त्या माध्यमाद्वारे खेळाडूंच्या संपर्कात राहण्याचा वेगळा प्रयत्न केला जात आहे. इतर कार्यालयाप्रमाणे सातारा जिल्हा क्रीडा कार्यालयही हायटेक झाले आहे.

क्रीडाविषयक परिपूर्ण माहिती

अ‍ॅपमध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांची नावे देण्यात आली असून त्यांचे संपर्क नंबर देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या खेळाच्या स्पर्धा कधी, कुठे, केव्हा होणार याचा कॅटलॉगही आहे. खेळांच्या स्पर्धांचे वर्षभराचे वेळापत्रक देण्यात आले आहे. फोटो गॅलरीमध्ये सातारा जिल्हा क्रीडा कार्यालय, तालुका क्रीडा कार्यालये, शहरात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांचे फोटो आहेत. खेळाडूंना आवश्यक असणारे सर्व मेल, आयटी या विभागात आहेत. तसेच जिल्हा, तालुका क्रीडा अधिकारी यांचे पत्ते, फोन नंबर, मेल आयडी देण्यात आले आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या मोबाईलवर स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करता येणार असून सरकारच्या क्रीडा विषयक नव्या घोषणा पाहता येणार आहेत.

अ‍ॅपद्वारे मिळणार सर्व माहिती…

क्रीडा विभागाने सातारा स्पोर्टस् अ‍ॅप विकसित केले आहे. बहुतांश लोक कॉम्प्युटरपेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात म्हणून या साधनाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना सातारला येण्याची गरज भासू नये, हादेखील या अ‍ॅप मागचा उद्देश आहे. खेळांची माहिती, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू माहिती, शासन निर्णयाबाबत माहिती अवगत करून देण्यात येणार आहे.

मोबाईल संकल्पनेतून अ‍ॅप

सध्या बहुतांश व्यवहार हे मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन होत असतात. बँकेतून पैसे ट्रान्स्फर करणे असो अथवा रेल्वेचे तिकीट काढणे असो, सर्वच व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन होत आहेत. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने खेळाडूंपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईलचा वापर करण्याचे निश्चित केले आणि सातारा स्पोर्टस् अ‍ॅप तयार केले आहे.

स्पर्धांसाठी करता येणार नावनोंदणी

या अ‍ॅपच्या माध्यमातून खेळाडूंना हवी ती माहिती मोबाईलच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच विविध प्रकारच्या स्पर्धांची नावनोंदणी करता येणार आहे. या अ‍ॅपमध्ये सातारा जिल्हा विषयी माहिती देण्यात आली असून सरकारतर्फे खेळासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकार व भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या पुरस्काराप्राप्त पुरस्कारार्थींची नावेही यात घेण्यात आली आहेत.

शहरासह जिल्ह्यातील खेळाडूंना कोणत्याही माहितीसाठी कार्यालयात हेलपाटे मारायला लागू नयेत यासाठी सातारा स्पोर्टस् अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातारा जिल्ह्याविषयी माहिती, पुरस्कार, क्रीडा संकुल, क्रीडा संघटना, क्रीडा प्रकार, फोटो गॅलरी, संपर्क, खेळांची माहिती, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू माहिती, शासन निर्णय याबाबत माहिती अवगत करून देण्यात येणार असल्याने खेळाडू व मार्गदर्शकांना हे अ‍ॅप सोयीचे होणार आहे.
– युवराज नाईक, जिल्हा क्रीडाधिकारी

Back to top button