Rushikant Shinde: पक्षांतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेत प्रवेश; ऋषिकांत शिंदे यांचा खुलासा | पुढारी

Rushikant Shinde: पक्षांतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेत प्रवेश; ऋषिकांत शिंदे यांचा खुलासा

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी पक्षात असणारी गद्दारी व अंतर्गत असणारे मतभेद, समन्वयाचा अभाव व गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत माझा पक्षांतर्गतच कुरघोड्यांमुळे जाणीवपूर्वक केलेला पराभव. या पार्श्वभूमीवर मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते, माथाडी कामगारांचे ज्येष्ठ नेते ऋषिकांत शिंदे (Rushikant Shinde) यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना केला.

राष्ट्रवादीचे नेते ऋषिकांत शिंदे (Rushikant Shinde) हे आमदार शशिकांत शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे पडद्यामागचे अदृश्य शक्ती म्हणून उभे राहिलेले ऋषिकांत शिंदे यांची सातारा जिल्ह्यातील व नवी मुंबई राष्ट्रवादी पक्षात ओळख आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक लढाया जिंकण्यामध्ये ऋषिकांत शिंदे यांचा वाटा आहे. यातच जावळी तालुक्यात शशिकांत शिंदेंना १० वर्षांपासून आमदार करण्यात ऋषिकांत शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. ऋषिकांत शिंदे यांनी अचानक राष्ट्रवादी पक्षाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा खांद्यावर घेत जय महाराष्ट्रचा नारा दिला. या सर्व घडामोडीमुळे आमदार शशिकांत शिंदे व राष्ट्रवादीला जोरदार धक्का मानला जात आहे. आगामी काळातील राष्ट्रवादी पक्षासह व भविष्यातील सगळ्या निवडणुकीची समीकरणे बदल्याची शक्यता आहे.

दैनिक पुढारीने नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेले ऋषिकांत शिंदे यांचे संपर्क साधला असता रूषिकांत शिंदे म्हणाले मी जिल्हा परिषद कुडाळ गटामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर उभे होतो. मात्र, पक्षांतर्गत गद्दारीमुळे व कुरघोड्याचे राजकारणामुळे पराभव केला.
जिल्हा परिषद कुडाळ गटात राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर माझा पराभव झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला गेला नाही. जनतेला न्याय दिला गेला नाही. नवी मुंबईमध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत. त्या कामांना न्याय देण्यासाठी माथाडी कामगारांना खऱ्या अर्थाने त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नपूर्तीसाठी मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे ऋषिकांत शिंदे यांनी सांगितले.

जावळी तालुक्यातील याचे पडसाद उमटले आहेत. ऋषिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना नवा पक्ष नवी दिशा मिळाल्यामुळे जावळी तालुक्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे शशिकांत शिंदे यांचा शिंदे गटाच्या आमदार महेश शिंदे यांच्याशी कोरेगाव तालुक्यात संघर्ष सुरू आहे. आता त्याच गटात ज्येष्ठ बंधू ऋषिकांत शिंदे यांचा प्रवेश झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

हेही वाचा 

Back to top button