शरद पवारांची लोकसभेसाठी जोरदार तयारी, सातारा, माढ्याची चाचपणी

शरद पवारांची लोकसभेसाठी जोरदार तयारी, सातारा, माढ्याची चाचपणी
Published on
Updated on

सातारा, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा व माढा मतदारसंघाची चाचपणी केली. या दोन्ही मतदारसंघातील पदाधिकार्‍यांकडून आढावा घेताना त्यांनी संभाव्य उमेदवारीबाबत कानोसाही घेतला. दरम्यान, राष्ट्रवादीने लोकसभेसाठी जोरदार व्यूहरचना आखल्याचे समोर आले असून माढ्यातून आ. रामराजे ना. निंबाळकर की संजीवराजे ना. निंबाळकर याचीही उत्सुकता यावेळी दिसून आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक मंगळवारी राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खा. श्रीनिवास पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आदींसह आजी, माजी खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सातार्‍यातून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, नितीन पाटील, प्रभाकर देशमुख, सुरेंद्र गुदगे, दीपक पवार, नंदकुमार मोरे, मनोज पोळ, सुनील माने, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदार व पदाधिकार्‍यांनी सातारा लोकसभेसाठी पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने राष्ट्रवादीची एकजूट दाखवण्याचा विश्वास शरद पवार यांच्यापुढे व्यक्त केला; तर माढा लोकसभेसाठी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर किंवा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित केले जाणार असून त्यासाठी सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

सातारा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनील माने यांनी सांगितला. यावेळी खा. शरद पवार यांनी प्रत्येक मतदारसंघात बूथ बांधणी करावी, तसेच राष्ट्रवादीचे आमदार नसलेल्या मतदारसंघात विशेष लक्ष घालून बूथ बांधणी करावी, तेथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकार्‍यांना ताकद देण्याची सूचना केली. यावेळी सर्वांनीच सातारा लोकसभेला पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकतीने मैदानात उतरण्याची तयारी केल जाईल, तसेच आगामी काळात पक्षाची एकजूट दाखवली जाईल, असा विश्वास आजी माजी आमदारांनी व्यक्त केला.

माढा लोकसभेच्या चर्चेवेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर किंवा संजीवराजे यांच्या पैकी एकाला संधी देण्याची मागणी झाली. यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी माढातून रामराजेंनाच संधी दिल्यास सोयीचे होईल, असे सांगितले. यावर सोलापूरात समाविष्ठ विधानसभा मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा करुनच नाव निश्चित कले जाईल, असे पवार यांनी सांगितले.

उदयनराजे विरोधी उमेदवार असतील असे समजून नियोजन…

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचा एक असे तीन आमदार आहेत. तर विरोधी भाजपचा एक व शिवसेना (शिंदे गट) दोन असे एकूण तीन आमदार आहेत. महाविकास आघाडी एकत्र लढल्यास तीन विरुद्ध तीन अशी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. पण, राष्ट्रवादी स्वतंत्र लढली तर दोन आमदार असल्याने ताकद कमी पडणार आहे. उदयनराजेंचे सातारा विधानसभा मतदारसंघात लीड कमी होणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचाच प्रयोग सातार्‍यात करण्याकडे सर्वांचा कल राहणार आहे. त्यावर खा. शरद पवार काय निर्णय घेणार आणि कोण उमेदवार असणार यावर सर्व अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news