सातारा : चोरट्यांकडून 7 घरफोड्या उघडकीस | पुढारी

सातारा : चोरट्यांकडून 7 घरफोड्या उघडकीस

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयितांना अटक केले असता, त्यांनी 7 घरफोड्यांची कबुली दिली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) 49 सिलेंडर टाक्यांसह सोन्याचा ऐवज जप्त केला आहे. संशयितांमध्ये चौघेजण असून त्यांच्याकडे 6 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे.

जीवन शहाजी रावते (रा. दत्तनगर, कोडोली, सातारा), अमर बापूसाहेब देवगुडे (रा. खोकडवाडी, कोडोली, सातारा), महेश अंकुश देशमुख (रा. हरपळवाडी, ता. कराड), विजय आत्माराम रिटे (रा. व्यंकटपुरापेठ, सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सुमारे 10 महिन्यांपूर्वी अतित ता. सातारा येथील भारत गॅस एजन्सीच्या गोडावून मधून सिलेंडरच्या टाक्या चोरी झाल्या होत्या. याबाबत एलसीबी पोलिसांना संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काही जणांची धरपकड केली असता संशयितांनी अतित येथून 35 सिलेंडरच्या टाक्या व पुसेगाव येथून 14 सिलेंडरच्या टाक्या चोरी केल्याची कबुली दिली. तसेच आणखी दोन घरफोड्या केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 01 हजार 500 रुपये किमतीच्या 49 सिलेंडर टाक्या व गुन्ह्यात वापरलेले 2 लाख रुपयांचे वाहन जप्त केले.

एलसीबी पथकाने संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी मिळाली. संशयितांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी सातारा, माण, पाटण या तालुक्यातही घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार संशयितांकडून चोरीस गेलेले 3 लाख 30 हजार 100 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, तांबा पितळेची भांडी जप्त करण्यात आली.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोनि अरुण देवकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष पवार, रवींद्र भोरे, रवींद्र तेलतुंबडे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, पोलिस तानाजी माने, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, मुनीर मुल्ला, अमोल माने, राकेश खांडके, प्रवीण कांबळे, स्वप्नील दौंड, सचिन ससाणे, मयूर देशमुख, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, पंकज बेसके, प्रवीण शिंदे, प्रकाश वाघ यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button