सातारा दरोड्यातील संशयित कोल्हापूरचे | पुढारी

सातारा दरोड्यातील संशयित कोल्हापूरचे

सातारा, पुढारी वृत्तसेवा : काशिळ गावच्या हद्दीत महामार्गावर दरोडा टाकून 17 लाख 62 हजार रुपये किमतीचे चांदी व सोन्याचे दागिने लंपास करणार्‍या टोळीतील सर्व सात संशयितांना जेरबंद करण्यात सोमवारी पोलिसांना यश आले. हे सर्व जण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 17 लाख 19 हजार 820 रुपयांचा माल तसेच गुन्ह्यात वापरलेली छर्‍याची बंदूक, तीन चॉपर, इनोव्हा कार व मोबाईल असा 24 लाख 72 हजार 820 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सर्फराज नदाफ (वय 34), मारुती मिसाळ (21), समीर मुलाणी (29), रियाज मुजावर (33 चौघे रा. कुंभोज, ता. हातकणंगले), सूरज कांबळे (24), करण कांबळे (34 दोघे रा. सावर्डे, ता. हातकणंगले) व गौरव घाटगे (23, रा. मिणचे, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

दि. 27 रोजी मध्यरात्री काशिळ हद्दीत लूटमारीची ही घटना घडली होती. संशयितांनी 17 लाख 62 हजार रुपये किमतीचे 110 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 17 किलो चांदी चोरून नेली होती. संशयित सोलापूर हायवेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कासुर्डी टोल नाका येथे नाकाबंदी करून त्यांना पकडण्यात आले. दोन दिवसांत सात जणांना अटक करण्यात आली.

ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल, पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, कराड उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Back to top button