आ. शेलार-आ. शिवेंद्रराजे यांच्यात खोलीबंद चर्चा | पुढारी

आ. शेलार-आ. शिवेंद्रराजे यांच्यात खोलीबंद चर्चा

सातारा; पुढारी वृत्तसेवा :आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी भाजपचे नेते आ. आशिष शेलार रविवारी सातारा दौर्‍यावर आले होते. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरूची निवासस्थानी आ. शेलार व आ. शिवेंद्रराजे यांच्यात सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा झाली. सातार्‍यात भाजपला भक्कम करण्यासाठी त्यांनी रणनीती आखली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. जिल्ह्यात भाजपकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून चांगल्या प्रकारे काम केले जात आहे का? हे पाहत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप पक्ष मजबुतीने उतरणार असल्याने त्याअनुषंगाने आढावा घेण्यासाठी आ. आशिष शेलार यांनी सातारा येथे येऊन आ. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा झाली. यावेळी अन्य कोणीही पदाधिकारीआतमध्ये उपस्थित नव्हते.

दोघातील चर्चेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांसह नोव्हेंबरमध्ये होणार्‍या पालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तयारीचाही आढावा आढावा घेतल्याचे समजते. जिल्ह्यात पक्ष वाढ, बुथ कमिट्या सक्षम करणे यावर भर दिला जाणार असल्याची चर्चा आहे.

आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी बुथ बांधणी सुरू केली आहे. यामध्ये सक्षम कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. सातार्‍यात भाजपने बुथनिहाय बांधणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने या दोघांच्या भेटीत चर्चा झाल्याचेही सांगण्यात येते.
जिल्हा दौर्‍यात आ. आशिष शेलार यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी व पदाधिकारीही सहभागी आहेत.

Back to top button