सातारा : माणदेश पुन्हा ठरला गुणवंतांची खाण; ओंकार गुंडगे यांचे यश दुष्काळी पट्ट्यासाठी अभिमानास्पद | पुढारी

सातारा : माणदेश पुन्हा ठरला गुणवंतांची खाण; ओंकार गुंडगे यांचे यश दुष्काळी पट्ट्यासाठी अभिमानास्पद

सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा दुष्काळी पट्ट्यातील दहिवडी (ता. माण) येथील ओंकार राजेंद्र गुंडगे यांनी युपीएससी परीक्षेमध्ये देशात ३८० वी रँक मिळवत माणदेश गुणवंतांची खाण असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. दहिवडीतील पहिला आयएएस होण्याचा मान त्यांनी मिळवला असून अथक प्रयत्नातून यश मिळवून प्रशासकीय सेवेत उमटवलेली मोहोर कौतुकाचा विषय ठरली आहे. त्यामुळे दहिवडीत फटाके फोडून व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दररोज आठ तास अभ्यास, एक तास व्यायाम तसेच खेळाला वेळ देत ओंकार यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष दिले. अभ्यासाचा ताण हलका होण्यासाठी खेळ व व्यायाम आवश्यक आहे. वाचनाबरोबरच अभ्यासाची उजळणी करावी. आंधळेपणाने यूट्युबवर कोणालाही फॉलो न करता स्वतः ची शैली निर्माण करावी, असा सल्ला ओंकार गुंडगे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.
पहिल्याच प्रयत्‍नात इंटरव्ह्यूमध्ये यश मिळवले.

आई सुवर्णा व वडील राजेंद्र गुंडगे हे दहिवडी येथील प्रतिष्ठीत कापड व्यापारी असून, मुलाच्या ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी खंबीर साथ दिली. ओंकार यांनी मिळवलेले यश माणदेशासाठी गौरवाची बाब ठरली.

या यशाबाबत ओंकार गुंडगे म्हणाले, ग्रामीण भागाची नाळ जोडली असल्याचा फायदा झाला. आपली नैसर्गिक प्रकृती सांभाळून अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेसोबत प्लॅन बी तयार असणे गरजेचे आहे. आयएएस किंवा आयपीएसमध्ये जेथे संधी मिळेल तेथे शंभर टक्के योगदान देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button