सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार : उदय सामंत | पुढारी

सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार : उदय सामंत

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  शिंदे-फडणवीस सरकारने 13 हजार उद्योजक निर्माण केले असून आगामी काळात मोठ्या संख्येने रोजगारनिर्मितीही करणार आहे. सातारा जिल्ह्यासाठीही आयटी पार्कबाबत विचार करू. शिवाय लवकरच स्कील डेव्हलपमेंट सेंटर, कामगारांच्या रुग्णालयास जागा, एमआयडीसीसाठी प्रादेशिक अधिकारी देण्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा येथील यशोदा कॅम्पसमध्ये महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

मेळाव्यास पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. रणजीतसिंह निंबाळकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, माजी सभापती सुनील काटकर, धैर्यशील कदम, राजेंद्र यादव, यशोदाचे संस्थापक प्रा. दशरथ सगरे, काका धुमाळ, संग्राम बर्गे, प्रीतम कळसकर, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. रोजगार निर्मितीबरोबरच उद्योजकांची निर्मिती करायची आहे. येत्या वर्षभरात 25 हजार उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. टुरिझमसाठी उद्योग विभागाने सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. युवकांनी मिळालेली नोकरी प्रामाणिकपणे करण्याबरोबरच स्वत:चा व्यवसाय सुरू होईल याकडे लक्ष द्यावे.

खा. उदयनराजे म्हणाले, आपला भविष्यकाळ हा आपल्या हातात असतो. त्यामुळे युवकांनी आपले ध्येय ठरवावे, जिद्दीने पाठपुरावा करावा. नोकरी मागणारे नव्हे तर देणारे व्हावे. संधी एकदाच दार ठोठावते, परत येत नाही. आपल्याला इतिहासजमा व्हायचं नाही. तरुणांच्या रोजगारासाठी वाट्टेल ते करु.

संग्राम बर्गे यांनी प्रास्ताविक केले. नोकरीची संधी मिळालेल्या उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती पत्र, जिल्हास्तरीय लघूउद्योग पुरस्कारांचे वितरण व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्ज वाटपाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

सातबारा नाही, तर दिल बडा होना चाहिए…

खा. उदयनराजे भोसले हे महाराष्ट्रातील सर्व सातबाराचे मालक आज या व्यासपीठावर आहेत; पण त्यांना ते तसं म्हटलेलं आवडत नाही. त्यांचं म्हणणं आहे ‘सातबारा नाही तर दिल बडा होना चाहिए।’ संग्राम बर्गे यांच्या या सूचक वक्तव्याला खा. उदयनराजेंनी दाद दिली. खा. उदयनराजे यांनी समोरील तरुणाईकडे पाहत, ‘माझा सातबारा तुम्हीच आहात. आपण जन्माला यायच्या अगोदरपासून हे डोंगर, ही झाडी आहे. माझा सातबारा म्हणजे कागदाचा चिटूर नाही, तर तुम्ही बसलेले तरुण आहात. वेळ एकदाच येते, संधी एकदाच येते, फायदा कधी घ्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे’, अशी भावुक साद खा. उदयनराजेंनी घातली. दरम्यान, एमआयडीसीला उद्योगधंद्यांसाठी लागणारी जमीन शासनाकडून उपलब्ध न झाल्यास मी देतो, असे आश्वासनही खा. उदयनराजे भोसले यांनी दिले.

Back to top button