सातारा : दुचाकी झाडावर आदळून युवकाचा मृत्‍यू | पुढारी

सातारा : दुचाकी झाडावर आदळून युवकाचा मृत्‍यू

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा महाबळेश्वर शहरापासून अंदाजे चार किमी अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर कॅनॉट पीक पॉईंट परिसरात दुचाकी झाडावर धडकून झालेल्या अपघातात क्षेत्र महाबळेश्वर येथील ऋषिकेश विलास शिंदे (वय २०) हा युवक जागीच ठार झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाबळेश्वर येथील रे गार्डन वाहनतळामध्ये ऋषिकेश शिंदे हा युवक कामाला होता. रात्री अकरा वाजता कामावरून तो क्षेत्र महाबळेश्वर येथे घरी जेवण्यासाठी गेला होता रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास तो पुन्हा रात्री नाईट ड्युटीवर क्षेत्र महाबळेश्वरहून महाबळेश्वरच्या दिशेने येत असताना कॅनॉट पीक पॉईंट पासून काही अंतरावर मुख्य रस्त्यावर विरुद्ध दिशेला जाऊन त्याची यामाहा आर वन फाईव्ह एम एच ११ डीजी ६०११ ही दुचाकी थेट झाडावर जाऊन आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की, ऋषिकेश हा थेट जंगलामध्ये फेकला गेला. क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाऱ्या लोकांनी अपघातग्रस्त दुचाकी पाहून क्षेत्र महाबळेश्वर मधील युवकांना संपर्क साधून या अपघाताची माहिती दिली. ऋषिकेश याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन जाण्यात आले, मात्र उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ऋषिकेश एक होतकरू युवक होता. त्‍याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार असून कुटुंबियांसह त्यांच्या मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा :  

Back to top button