‘पुढारी’कारांच्या पुण्यतिथीला पुस्तकांचे दान; बाल सुधारगृह, कारागृहात उपक्रम | पुढारी

‘पुढारी’कारांच्या पुण्यतिथीला पुस्तकांचे दान; बाल सुधारगृह, कारागृहात उपक्रम

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरासह जिल्ह्यातील वाढत्या बालगुन्हेगारी विरोधात 1 जानेवारी 2023 रोजी दै.‘पुढारी’ने आक्रमक भूमिका घेऊन युवकांच्या डोक्यात चांगले विचार येण्यासाठी सातारकरांना पुस्तके देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्हावासीयांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर मिळालेल्या शेकडो पुस्तकांचे दान ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुण्यतिथी दिवशी शनिवार, दि. 20 मे रोजी सकाळी 11.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत येथील बाल सुधारगृह व जिल्हा कारागृहात केले जाणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शाळकरी, महाविद्यालयीन मुलांचा गुन्हेगारीमधील सहभाग कसा दिवसेंदिवस वाढत चालला आहे याबाबतची सातत्याने वृत्ते प्रसारित करून बाल गुन्हेगारी विरोधात ‘पुढारी’ने जोरदार आवाज उठवला. याच कालावधीत ‘पुढारी’च्या वर्धापनदिनी ‘पुढारी’ने ‘पुस्तक दान’ योजनेचे आवाहन केले. त्याला सातारकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली इनिसिएटिव्ह घेतले. समीर शेख यांनी ‘उंच भरारी’ हा उपक्रम हाती घेऊन युवकांमध्ये सकारात्मक बदल घडवला. पोलिस दलाने गेली पाच महिने मुले, युवक, त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधला. संवाद साधून संबंधित युवकांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले आहे.

उद्यापर्यंत पुस्तके देण्याचे आवाहन

दै.‘पुढारी’ने राबवलेल्या पुस्तक दान या चळवळीत अजूनही कोणाला सहभागी व्हायचे असेल त्यांनी उद्या शनिवार, दि. 20 मे रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत दै.‘पुढारी’ कार्यालयात थोर व्यक्तींची आत्मचरित्रे, चरित्रे, जीवन सकारात्मक जगण्यासंबंधीची पुस्तके आणून द्यावीत. शनिवारी हीच पुस्तके सातार्‍यातील बाल सुधारगृहात व कारागृहात जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या हस्ते दान केली जाणार आहेत.

Back to top button