रोहयोचा आराखडा 222 कोटी 46 लाखांचा; साडेतेरा लाख लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी | पुढारी

रोहयोचा आराखडा 222 कोटी 46 लाखांचा; साडेतेरा लाख लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी

सातारा; प्रवीण शिंगटे :  जिल्हा परिषदेने चालू सन 2023-2024 या वर्षातील रोजगार हमी योजनेचा 222 कोटी 46 लाख 5 हजार रुपयांचा आराखडा तयार केला असून, त्याला जिल्हा परिषदेच्या ठराव समिती सभेत मंजुरीही देण्यात आली आहे. या आराखड्यात गांडूळ खत युनिट, नाडेफ युनिट, फुलशेती, फळबाग लागवड, शेततळे, शेळीपालन शेड, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, शोषखड्डा, शौचालय, घरकुल, कुक्कुट पालन शेड, जनावरांचा गोठा, गोबर गॅस सयंत्र, पडीक जमिनीत फळबाग लागवड, ओढ्यालगत संरक्षक भिंत, पाणंद रस्ते अशी एकूण 37 हजार कामे प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे गावोगावच्या नागरिकांच्या हाताला काम मिळणार आहे.

ग्रामीण भागातील बेरोजगारांना गावातच हक्काचा रोजगार मिळावा या उद्देशाने गावागावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे करण्याची मुभा ग्रामपंचायतींना देण्यात आली. मागेल त्याला गावातच वर्षभरातील किमान 100 दिवसांचा रोजगार या योजनेतून मिळावा. या उद्देशाने ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. रोजगार हमी योजनेतून ग्रामीण शेतकरी, शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा, महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण आणि पंचायतराज संस्थांना बळकट केले जात आहे.

रोहयो अंतर्गत सन 2023-24 या वर्षातील कामांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या ठराव समितीच्या सभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यात काँक्रीट नालाबांध, ग्रामपंचायत भवन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, नाला खोलीकरण, पाणंद रस्ते, पेव्हर ब्लॉक बसवणे, बिहार पॅटर्न वृक्षलागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सलग समतल चर, सार्वजनिक गोदाम, शेततळे, शोषखड्डा, सिंचन विहीर, स्मशानभूमी शेड व सुशोभीकरण, दगडी बांध, माती नालाबांध, रोपवाटिका, विहिरीतील गाळ काढणे, अंगणवाडी इमारत व किचन शेड, व्यायामशाळा, गांडूळखंत युनिट, शाळा स्वयंपाक गृह, संरक्षक भिंत, मल्टी युनिट शौचालय, शोषखड्डे, संरक्षक भिंत, खेळाचे मैदान, ओढा खोलीकरण रुंंदीकरण, सलग समतल चर अशी गाव विकासाची व शाळा विकासाची कामे करण्यात येणार आहेत.

Back to top button