

कराड; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योग्य निर्णय न घेतल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याचे सूतोवाच केला आहे. केवळ नैराश्यातून त्यांनी हे वक्तव्य केले आहे, असे सांगत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. तसेच व्हीप आमचाच चालणार असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी ज्या सल्लागारांचे ऐकून मागील वर्षी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, त्याच सल्लागारांना याबाबत अधिक विचारावे, असा उपरोधिक टोलाही देसाई यांनी यावेळी लगावला आहे.
मंत्री देसाई यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत बोलण्यास नकार देत त्यांचा दररोज सकाळी दहाचा भोंगा ऐकला की लोक चॅनेल बदलतात. मी त्यांना पहातही नाही आणि ऐकत सुद्धा नाही. ते जे बोलतात, ते आजवर एकदा तरी खरं ठरले आहे का? असा प्रतिप्रश्न करत संजय राऊत उगाच हवा सोडतात अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. तसेच अनिल परब हे मोठे वकील आहेत. ते काहीही दावा करू शकतात, असा टोलाही मंत्री देसाई यांनी आमदार अनिल परब यांना लगावला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सर्वांचे म्हणणे ऐकून घेत आमदार अपात्रतेबाबत योग्य निर्णय देऊ असे सांगितले आहे. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जर न्यायालयाने आपणास निर्णय घेण्याची सूचना केल्यास आपण आमदारांना अपात्र ठरवू, असे सांगितले होते. याकडे लक्ष वेधत त्यांची भूमिका पूर्वग्रहदूषित होती अशा शब्दांत न्यायालयाच्या निर्णयामुळे महायुती सरकार अधिक भक्कम झाल्याचेही मत देसाई यांनी यावेळी व्यक्त केले.
हेही वाचलंत का ?